
सामना प्रतिनिधी । मुंबई
नागरिकांकडून विविध प्रश्नांसाठी केली जाणारी आंदोलने तसेच त्यामध्ये सामील होणारे लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात. असे राजकीय तसेच सामाजिक गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिले होते. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पार पडलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 30 गुन्हे मागे घेण्यात आले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर 45 गुह्यांची यादी देण्यात आली होती. यापैकी 30 गुन्हे मागे घेण्यात आले तर तीन गुन्हे प्रलंबित आहेत. 13 गुन्हे मागे घेण्यास नकार देण्यात आला आहे. आमदार बच्चू कडू, माजी आमदार अनंत तरे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावरील राजकीय तसेच सामाजिक गुन्हे मागे घेण्यात आले. संभाजीनगर येथे 2016 साली झालेले शिक्षक आंदोलन, कोल्हापूर-चंदगड येथील एमआयडीसीचे आंदोलन यामधील गुन्हे मागे घेण्यात आले, तर धुळे येथील कोळी समाजाविरुद्धचे काही गुह्यांप्रकरणीचा निर्णय प्रलंबित ठेवला. जिल्हा, राज्यस्तरावरील पोलिसांच्या समितीने प्रत्येक गुह्याविषयीचा अभ्यास केल्यानंतरच खटले मागे घेण्याचा निर्णय झाला. मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे अशा प्रकारचे गुन्हे मात्र मागे घेण्यात आले नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.


























































