
सामना प्रतिनिधी, मुंबई
रात्रीच्या वेळेस कॅटरर्सचे काम आणि दिवसा महिलांचा पाठलाग करणाऱ्या विकृताच्या सीएसटी रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अश्रफअली ऊर्फ समीर करीम उल्ला शेख असे त्याचे नाव आहे. पोक्सोच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर अश्रफ अलीची त्याच्या पत्नीने साथ सोडली होती. 450 हून अधिक सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर पोलीस अश्रफअलीपर्यंत पोहचले.
तक्रारदार महिला दहा दिवसांपूर्वी सीएसएमटी येथून लोकलने प्रवास करीत होती. सकाळच्या वेळेस गर्दी नसल्यामुळे अश्रफअली हा महिलांच्या कोचमध्ये शिरला, तेव्हा महिलेने त्याला जाब विचारला. त्या दरम्यान लोकल मशीद बंदर येथे थांबली नाही. त्याचा फायदा घेत अश्रफअली महिलेजवळ गेला. त्याने महिलेचा हात पकडला. तेव्हा जीव वाचवण्याकरता महिलेने धावत्या लोकलमधून उडी मारली. त्यात महिला जखमी झाली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक गणपत गोदके, एएसआय यशवंत गावकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या दिवशी अश्रफअली हा गोल देऊळ परिसरातून ग्रँट रोड परिसरात गेला. सीसीटीव्हीच्या फुटेजनंतर पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेतली. रेल्वे पोलिसांनी चर्चगेट आणि सीएसएमटी परिसरात सध्या वेशात पोलीस तैनात केले होते. सोमवारी अश्रफअली हा चर्चगेट रेल्वे स्थानकात आला. धावत्या लोकलमधून तो खाली उतरला तेव्हा पोलीस शिपाई टकले यांनी अश्रफअलीचा पाठलाग केला. पाठलाग केल्यावर अश्रफअली हा एसएनडीटी कॉलेज परिसराजवळ पळू लागला. टकले यांनी पाठलाग करून अश्रफअलीला पकडले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याकरता अश्रफअलीने टकलेंशी झटापट केली. त्याची अंगझडती घेतली असता एक चाकू पोलिसांनी जप्त केला. अवघ्या 9 दिवसांतच पोलिसांनी अश्रफअलीला गजाआड केले.
शिक्षा भोगून आल्यावरही सुधारला नाही
अश्रफअली हा जीटीबी नगर येथे पूर्वी राहत होता. त्याला ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यावर त्याच्या पत्नीने त्याची साथ सोडली होती. त्यानंतर तो रेल्वे स्थानकात राहायचा. रात्रीच्या वेळेस कॅटरर्सचे काम करायचा. धमकावण्याकरता तो सोबत चाकू ठेवत असायचा. लेडीज कोचमध्ये एकट्या असलेल्या महिलांना तो हेरत असायचा.





























































