
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
केंद्राची सत्ता असतानाही ज्यांना परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्राच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत समावेश करता आला नाही. साधी परळी – मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुनावले आहे. तसेच चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे सोपे वाटले का, असा सवाल करत त्यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार नामोल्लेख न करता घेतला.
परळीत शनिवारी होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारीबाबत परळी शहरातील कार्यकर्त्यांच्या हालगे गार्डन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. रायगड येथुन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप प्रभू वैजनाथाच्या पावन नगरीत होणार आहे. केंद्रात, राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ आपल्या विरोधात आहे, असा गोड गैरसमज करून घेणार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असणारी परळी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाली आहे. पुन्हा एकदा राज्याला या सभेच्या माध्यमातून परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी शनिवारची सभा यशस्वी करा, असे आवाहन मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले.































































