देवबंदमधून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे. अजून कोणताही हल्ला होऊ नये यासाठी देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद पथकाने देवबंद इथून दोन दहशतवाद्यांना अटक केली असून त्यात जैश-ए-मोहम्मदच्या शाहनवाज अहमद तेली या दहशतवाद्याचाही समावेश आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांपैकी शाहनवाज हा मूळचा कुलगामचा रहिवासी आहे. तो दहशतवाद्यांची नवीन फौज उभारण्यासाठी तरुणांची भर्ती करण्याचं काम करतो. तो गेल्या बऱ्याच काळापासून उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हे काम करत होता. शाहनवाज ग्रेनेड बनवण्यात कुशल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव अकिब अहमद मलिक असून तो पुलवामा इथला रहिवासी आहे.

या दोघांकडून दोन हत्यारं आणि जिवंत काडतुसं, काही मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीस जम्मू-कश्मीर पोलिसांच्या मदतीने अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.