
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षपूर्ण परिस्थितीत मुंबईसह प्रमुख शहरांत हायऍलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षेत गुंतलेले पाच ते सहा हजारांचे पोलीस दल मुंबईच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार दोन दिवस आधीच अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. पुढील पावसाळी अधिवेशन 17 जूनला मुंबईतच घेतले जाणार आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन संस्थगित करून सुरक्षेसाठी असलेले पोलीस दल शहराच्या अंतर्गत संरक्षणासाठी उलपब्ध करण्याचा निर्णय गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर येत्या चार महिन्यांसाठी मांडण्यात आलेल्या लेखानुदानाला एकमताने मंजुरी देण्यात आली. लेखानुदान मंजूर झाल्यानंतर लगेच सभागृहाची बैठक सुमारे दीड तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, देशातील परिस्थितीमुळे काळजीचे वातावरण आहे. देशांतर्गत सुरक्षा ही महत्त्वाची आहे. सीमेची काळजी जवान घेण्यासाठी सक्षम आहेत, मात्र मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यासोबतच इथे अधिवेशन सुरू असल्याने सुमारे सहा हजार पोलीस इथल्या बंदोबस्तात गुंतले आहेत. त्यांना मोकळे करून मुंबई आणि राज्याची सुरक्षा करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात यावे अशी मागणी अध्यक्षांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संस्थगित करण्यात येत असले तरी नागरिकांनी यामुळे भयभीत होऊ नये असे आवाहन केले. यावेळी विरोधी पक्षनेते तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांचे त्यांनी आभार मानले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशन गुंडाळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत प्रस्तावाला पाठिंबा दिला.
अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानातून परत आणा!
पाक लष्कराच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानातून परत आणा. या विषयीचा प्रस्ताव राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावा असा ठराव करण्याची मागणी राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्धमान यांना परत आणण्याचा ठराव करून तो राज्यपालांना पाठविण्यात यावा अशी मागणी केली. या ठरावाला सभागृहाने संमती दिली.

























































