
सामना ऑनलाईन । अमृतसर
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या हिंदुस्थानचे विंग कमांडर अभिनंदन यांची आज पाकिस्तानने सुटका केली. अभिनंदन हे अटारी वाघा बॉर्डरवरून हिंदुस्थानात परतले. सीमेवर हवाई दलाचे एअर वाईस मार्शल एजीके कपूर व अन्य हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अभिंदन परतणार असल्याने आज हिंदुस्थानने बिटींग द रिट्रीट देखील रद्द केले होते. मात्र अभिनंदन यांच्या स्वागतासाठी हजारों देशप्रेमी अटारी-वाघा बॉर्डरवर उपस्थित होते.
बुधवारी हिंदुस्थानी हवाई दलाचे मिग-21 विमान पाकिस्तानात कोसळले होते. त्यानंतर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. दरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर संसदेचे एक विशेष सत्र बोलावले होते. त्यात इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानने शांततेचा संदेश देण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्याचे ठरवले असल्याचे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले.

























































