परळमध्ये आपत्ती व्यवस्थापन संस्था व संशोधन केंद्र सुरू, आदित्य ठाकरे  यांच्या हस्ते उद्घाटन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई
आग, अतिवृष्टी किंवा कुठलीही दुर्घटना घडली तरी मुंबईकर स्वतः या संकटांना थेट भिडणार आहेत. पालिकेच्या अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन संस्था व संशोधन केंद्रामुळे हे शक्य होणार आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले.

मुंबईत घडणार्‍या अनेक दुर्घटनांच्या प्रसंगी आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दल, आरोग्य विभागासह संबंधित विभागांकडून बचावकार्य केले जाते. या संकटप्रसंगी जर नागरिक प्रशिक्षण घेतलेले असल्यास बचावकार्य वेगाने होऊन जीवित आणि वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परळ परिसरातील साईबाबा मार्गावर ‘शहर आपत्ती व्यवस्थापन संस्था व संशोधन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, आपत्कालीन व्यवस्थापनातील विविध यंत्रणांना त्यांच्या आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील तज्ञांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, सिंधू मसुरकर, दत्ता पोंगडे, समीक्षा सक्रे, आपत्कालीन विभागप्रमुख महेश नार्वेकर, उपप्रमुख संगीता लोखंडे, राजेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.

365 दिवस 24 तास सेवा

  • ‘बॅक अप नियंत्रण कक्ष’ वर्षाचे 365 दिवस 24 तास सुरू राहणार आहे. मुंबईत कुठलीही दुर्घटना, दहशतवादी हल्ला किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष बंद पडल्यास
    19 सेकंदांत या केंद्राकडून पुढील कार्यवाही सुरू करता येणार आहे.
  • प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईबाहेरून येणार्‍या तज्ञांसाठी चार अतिथी कक्ष तयार करण्यात आले आहेत. चौथ्या मजल्यावर 150 आसनी सभागृहदेखील सुरू करण्यात आले आहे. शिवाय आपत्तीविषयक माहितीपट दाखवण्यासाठी थ्री-डी सुविधा आहे.

सतर्कता, प्रशिक्षण आवश्यकच – आदित्य

मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या अत्याधुनिक आपत्कालीन प्रशिक्षण-संशोधन केंद्रामुळे मुंबईकर आपत्कालीन परिस्थितीचा स्वतः सामना करू शकल्यामुळे मोठा फायदा होणार असून जीवित आणि वित्तहानी टाळण्यास मदत होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा प्रसार करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.  

असे आहे प्रशिक्षण-संशोधन केंद्र

  • या इमारतीच्या तळमजल्यावर विविध आपत्तींची माहिती देणारे कलादालन उभारण्यात आले आहे. यामध्ये डायरोमा, म्युरल्स, चित्रफिती आदींच्या सहाय्याने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित माहिती मराठी व इंग्रजी भाषेत सोप्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
  • पहिल्या मजल्यावर अद्ययावत ग्रंथालय असून 60 आसनक्षमता असलेला
  • एक वर्ग आणि 30 आसनक्षमता असलेले तीन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
  • दुसर्‍या मजल्यावर 70 आसनांची क्षमता असणारे सभागृह असून त्याच्या शेजारी प्रशिक्षणार्थींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • तिसर्‍या मजल्यावर मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा ‘बॅकअप नियंत्रण कक्ष’.