दहिसरच्या आगीत लाखोंचे नुकसान; जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

सामना प्रतिनिधी। मुंबई

दहिसरमधील चारमजली व्यावसायिक इमारतीला सोमवारी सायंकाळी लागलेल्या आगीत लाखोंची वित्तहानी झाली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौथ्या मजल्यावर स्टेशनरी, ट्रॉफी पॅकिंगचे सामान असल्यामुळे आगीचा भडका आणखीनच उडाला. सागर इंडस्ट्रिअल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास ही आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. यात चार फायर इंजिन, चार वॉटर टँकर आदी सामग्रीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्यासह शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन आगीवर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत दुर्घटनेवर लक्ष ठेवून होते.