
सामना प्रतिनिधी, नागपूर
इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या यंदाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची ऑडिशन मानल्या जाणाऱ्या हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने स्वतःला सावरत सलामीचा सामना जिंकून 5 एकदिवसीय लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण बलाढय कांगारूंना आणखी दबावाखाली आणण्यासाठी नागपूरची दुसरी लढत जिंकून आपली आघाडी 2-0 अशी वाढवण्याच्या निर्धाराने विराटसेना उद्या मैदानात उतरणार आहे. अर्थात कांगारूही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी नागपूरमध्ये यजमानांना कडवी झुंज देणार हे निश्चित.उद्याचा दुसरा पेपर हिंदुस्थानला सोपा जाणार की नाही? याचे उत्तर हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना उद्या रात्रीच मिळणार आहे.
जाडेजाऐवजी चहलला संधी मिळण्याची शक्यता
हैद्राबादच्या पहिल्या वन डे लढतीत रवींद्र जाडेजाने किफायतशीर गोलंदाजी केली.पण विकेट मिळविण्यात मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे नागपूरमध्ये ‘चायनामन’ कुलदीप यादवच्या जोडीला फिरकीवीर युजवेन्द्र चहल संघात पुनरागमन करण्याचे संकेत आहेत. प्रभावी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी आपले काम चोख बजावल्याने त्यांच्यावरच नागपूर लढतीत वेगवान माऱ्याची भिस्त असेल.


























































