महिला डब्यांची संख्या जैसे थे, वर्किंग वुमनचा चेंगराचेंगरीत प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्किंग वुमेनची संख्या वाढली असतानाही लोकलच्या डब्यातील वाटा मात्र त्याप्रमाणात वाढला नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. उपनगरीय लोकलमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेन विशेष लोकलची संख्या वाढवली असली तरी सकाळ आणि सायंकाळच्या पिकअवरमध्ये तीदेखील अपुरी पडत आहे.

मुंबईच्या लाइफलाइन लोकलमधून दररोज सुमारे 80 लाख प्रवासी प्रवास करीत असले तरी त्यातील महिला प्रवाशांच्या संख्या 16 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या मध्य रेल्वेवर 8.58 लाख महिला तर पश्चिम रेल्वेवर 7.5 लाख महिला प्रवास करतात अशी आकडेवारी आहे. पश्चिम रेल्वेने महिलांसाठीची खास वुमेन्स स्पेशल ट्रेन 5 मे 1992 रोजी सुरू केली होती. आज पश्चिम रेल्वेवर 10 लेडीज स्पेशल ट्रेन धावत असून मध्य रेल्वेवर चार लेडीज स्पेशल तर 22 आंशिक लेडीज स्पेशल धावतात. 12 डब्यांच्या साध्या लोकलमध्ये पुढे आणि मागे तसेच मध्यभागी तसेच फर्स्ट क्लासच्या तीन जागी 13 आसने महिलांसाठी राखीव ठेवलेली असतात.

महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने 17 लोकलमधील 51 लेडीज डब्यांमध्ये एकूण 251 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, तर मध्य रेल्वेतही 110 लेडीज डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महिलांच्या डब्यात ट्रेनमध्ये रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत पोलीस संरक्षण पुरविण्यात येत असते. 122 ट्रेनमध्ये आरपीएफचे सुरक्षा जवान तैनात असतात. त्याशिवाय 84 महिला शिपायांचे आरपीएफचे महिला ‘वाहिनी’ पथक तैनात असून 113 मेल-एक्स्पेसमध्ये जीआरपीची सुरक्षा पुरविली जाते.