राफेलची  फाइल ‘फुटली’! सरकारची सारवासारव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafel-deal

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

राफेल लढाऊ विमाने खरेदी करारासंबंधीची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेलेली नाहीत तर याचिकाकर्त्यांनी अर्जासोबत ‘राफेल’च्या ओरिजिनल कागदपत्रांची ‘फोटोकॉपी’ जोडलेल्या आहेत अशी सारवासारव केंद्र सरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आज केली. दरम्यान, वेणुगोपाल यांच्या खुलाशामुळे ‘राफेल’ची फाइल चोरीला गेली नाही तर ती ‘फुटली’ असेच आता स्पष्ट होत आहे.

‘राफेल’प्रकरणी 13 डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा अशी याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत गौतम यांनी दाखल केली आहे. यावर मंगळवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी ‘राफेल’च्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाली अशी माहिती दिली होती. तसेच याचिकाकर्ते प्रशांत भूषण हे इंग्रजी दैनिक ‘हिंदू’मधील बातम्यांची कागदपत्रे सादर करीत आहेत असा आक्षेप घेतला होता. ‘हिंदू’ने चोरीला गेलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या दिल्या. हिंदू आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी  कारवाईचा इशाराही वेणुगोपाल यांनी दिला होता. मात्र, ‘राफेल’ची कागदपत्रे चोरीला गेल्याच्या वृत्ताने काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे. यावर आज ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना वेणुगोपाल यांनी नवा खुलासा केला आहे.

काय म्हणाले वेणुगोपाल?

सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान ‘राफेल’ची कागदपत्रे चोरीला गेल्याचे मी म्हणालो असा आरोप विरोधकांनी केला आहे, पण हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. फाइल्स चोरीला गेल्या असे मी बोललेलो नाही.