Lok sabha 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदूर्गात पोलीस दल सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बारा भरारी पथक व 22 तपासणी नाके स्थापना करण्यात आले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्य़ात 1854 अतिरिक्त पोलीस बळाची व चार सीआरपीएफ दलाची आवश्यकता लागणार आहे. जिल्ह्य़ात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे 43 जण हद्दपारीच्या रडारवर असून सध्यस्थितीत 19 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, लोकसभा निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या परंतु साक्ष देण्यास पोलीस ठाण्यात न येणाऱ्या सहा जणांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर 203 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जिल्ह्याला आणखीन 1854 पोलीसांची तर 236 होमगार्डची मदत लागणार आहे. त्याअनुषगाने आपण एवढ्या पोलीस बळाची मागणी केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व मतदार केंद्रांना भेटी देऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली आहे. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता जिल्ह्य़ात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 18 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी यांनी संबंधित प्रस्तावांवर सही केल्यानंतर या गुन्हेगारांना एका विशिष्ट कालावधी साठी जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहेत. तर आणखीन 23 जण हद्दपारीसाठी आमच्या रडारवर आहेत. ही संख्या पन्नास पर्यंत वाढू शकते असेही दिक्षीत गेडाम यांनी सांगितले.

50 अवैध दारू विक्रेत्यांवरही होणार कारवाई
जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय करून समाजात अशांतता पसरविणाऱ्यांविरोधातही पोलीसांनी कंबर कसली आहे. अशा 50 व्यावसायिक शोधून त्यांच्यावर हद्दपारी किंवा प्रतिबंधात्मक कारवाई होवू शकते. यासाठीचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. प्रांताधिकारी त्यावर निर्णय घेवून कारवाई करतील असे जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगितले.

निवडणूकीचे प्रशिक्षण पूर्ण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी सायंकाळी लागू झाली. या मतदारसंघातील निवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. ही निवडणूक अतिशय शांतपणे होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच या निवडणूकीला कसे सामोरे जावे यासाठीचे प्रशिक्षण जिल्ह्य़ातील पोलीस आणि होमगार्ड यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांना माहीती पुस्तिकाही देण्यात आली आहे.

150 सीसीटिव्ही बसवले
जिल्हानियोजनमधून जिल्ह्य़ात 150 च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे पोलीस ठाणे व रहदारीच्या ठिकाणी बसवून जिल्हा हायटेक करण्याचा प्रयत्न आहे. या कॅमेरांचा उपयोग जिल्ह्य़ातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी होणार आहे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांच्याकडे शस्त्र आहेत व गुन्हा दाखल झाला आहे अशांची आधी शस्त्रे ताब्यात घेणार असल्याचे दिक्षीत गेडाम यांनी सांगितले. तसेच गुन्हे नोंद असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे असेही ते म्हणाले. सावंतवाडी येथे मंगळवारी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोटार कार अज्ञाताने जाळली, याबाबत माहिती देताना दिक्षीत गेडाम म्हणाले, या घटनेचा तपास आपली यंत्रणा करत आहे. याबाबत काही पुरावे देखील आपल्याला मिळालेले आहेत. या पुराव्याच्या आधारे आपण येत्या सात दिवसात त्या आरोपी पर्यत पोचू असा विश्वासही दिक्षीत गेडाम यांनी व्यक्त केला.

12 भरारी पथकांची स्थापना
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ात 12 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन याप्रमाणे ही पथक कार्यान्वीत राहणार आहेत. या पथकात वरिष्ठ अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी,कार्यकारी दंडाधिकारी,कॅमेरामन यांचा समावेश असणार आहे.निवडणूकीत अवैध दारू तसेच पैशाची वाहतूक रोखता यावी यासाठी जिल्ह्यात 22 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या तपासणी नाक्यावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच अवैध धंद्यांना आळा बसेल असा विश्वास दिक्षीत गेडाम यांनी व्यक्त केला.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस फौजफाट्यासह चार सीआरपीएफ तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीत राजकीय राडा झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी या आरसीएफच्या तुकड्या महत्वपूर्ण भूमिका बजावतात.