
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीची रंगत आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला दूर ठेवत समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रात निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीची घोषणा 19 मार्चला मुंबईत होणार आहे. सपा व बसपा महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.
धर्मनिरपेक्ष आणि भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समाजवादी पक्षाने काँग्रेस आघाडीत सहभागी होण्यास अनुकूलता दर्शवली होती, मात्र आघाडीकडून एकही जागा सोडली जात नसल्याने समाजवादी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी देशात काँग्रेससोबत कुठेही समझोता केला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पक्षाकडून मुंबई तसेच मराठवाड्यात उमेदवार दिले जातील तर विदर्भात बसपा आपले उमेदवार उभे करेल. समाजवादी पक्षाचा भर उत्तर हिंदुस्थानींप्रमाणे मुस्लिम मतदारांवर आहे, तर बसपाची मदार दलित मतांवर आहे. या दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी 19 मार्चला संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करतील अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली. आमची आघाडी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवेल, असेही त्यांनी सांगितले.


























































