Lok sabha 2019 देशातील जनतेला आता बदल हवा आहे – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पूर्णिया

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारच्या पूर्णिमामध्ये घेतलेल्या सभेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि राफेल मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात फ्लॉप फिल्म दिल्या आहेत. आता देशाला बदल हवा आहे. जनता ‘मन की बात’ ऐकून कंटाळली आहे. सरकार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून सरकार फक्त श्रीमंतासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस सत्तेत आल्यास हे चित्र बदलू असे आश्वासनही त्यांनी दिले.

देशाचे चित्र बदलण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. जनता ‘मन की बात’ ला कंटाळली असून त्यांना बदल हवा आहेत. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही हे चित्र बदलू असे आश्वासनही त्यांनी दिले. आपण भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला घाबरत नसून आपण सत्याची साथ देत आहोत. आपली लढाई सत्याच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होणार होते, त्याचे काय झाले, दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत दिशाभूल का करण्यात आली हे प्रश्न जनतेने पंतप्रधानांना विचारण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आवाज उठवणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे बदल घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. भाजप सरकार श्रीमंतांना पैसे देऊ शकते, तर गरीबांना का देत नाही, असा सवालही त्यांनी केला.

आमचे सरकार असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यातील चित्र बदलले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. 2014 मध्ये भाजपचा नारा होता ‘अच्छे दिन आनेवाले है’ आणि आता देशभरातील जनता ‘चौकीदार चोर है’ असे नारे देत आहे. पाच वर्षात चौकीदार चोर कसा बनला असा सवालही त्यांनी केला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली.