
सामना ऑनलाईन । मुंबई
‘पीएनबी’ला चुना लावून लंडनला पळालेल्या नीरव मोदी याच्या संग्रहालयातील एक चित्र आज 60 कोटींना विकले गेले. गेल्या आठवड्यातच विशेष न्यायालयाने नीरवकडील चित्रांचा लिलाव करण्याची परवानगी आयकर खात्याला दिली होती. ‘पीएनबी’ घोटाळय़ानंतर नीरव मोदी हिंदुस्थानातून पसार झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने त्याच्या मालमत्तांवर टाच आणली. त्यात काही महागडी चित्रेही सापडली. आज ‘सॅफ्रन आर्ट’ या कंपनीने या चित्रांचा लिलाव केला. तेव्हा एक चित्र 59 कोटी 37 लाख रुपयांना विकले गेले. या चित्रासोबत काही चिनी चित्रकारांच्या चित्रांचाही लिलाव आज करण्यात आला.
लिलाव थांबवण्यासाठी हायकोर्टात धाव
या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत नीरव मोदीच्या कॅमेलॉट एंटरप्रायझेस या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. सॅफ्रन ऑर्ट या कंपनीमार्फत या चित्रांचा ऑनलाइन लिलाव करण्यात येत आहे. एकूण 68 चित्रांपैकी 19 चित्रे नीरव मोदीच्या मालकीची असून अन्य पेंटिंग्ज मोदीच्या कॅमेलॉट एंटरप्रायझेस व इतर कंपन्यांच्या मालकीची आहेत असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी चित्रांचा लिलाव करण्याची परवानगी मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने दिली आहे. सध्या या चित्रांचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाकडे असून चित्रकार राजा रविवर्मा, व्ही. एस. गायतोंडे, एम. एफ. हुसैन, अकबर पदमसी आदी नामवंत कलाकारांच्या चित्रांचा यात समावेश आहे.
नीरव जामिनासाठी नव्याने अर्ज करणार
कोटय़वधी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी ब्रिटन येथे अटक करण्यात आलेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा आता येत्या शुक्रवारी नव्याने जामीन अर्ज सादर करणार आहे. कोटय़वधींचा घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी हिंदुस्थानला हवा असलेला नीरव मोदी हा ब्रिटन येथे खुलेआम फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ताबडतोब अटक करण्यात आली. गेल्या बुधवारी त्याला जिल्हा न्यायमूर्ती मारिया मॅलोन यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. नीरव मोदीवरील गंभीर स्वरूपाचे आरोप लक्षात घेता जिल्हा न्यायाधीश मारिया मॅलोन यांनी त्याला जामीन देण्यास नकार देत शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले.
गेल्या बुधवारपासून एचएमपी वाण्डवर्थ तुरुंगात असलेल्या नीरवला येत्या शुक्रवारी वेस्टमिनिस्टर कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याचवेळी त्याची लीगल टीम नीरव मोदीच्या वतीने नव्याने अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. जामिनासाठी नीरवचा हा दुसरा अर्ज असणार आहे.


























































