
सामना ऑनलाईन । मुंबई
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळीही भगवाच फडकणार याला आधार मिळावा असेच वातावरण निर्माण झाले आहे. या मतदारसंघात शिवसेनेची प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस ‘डेंजर झोन’मध्ये गेली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे, काँग्रेस पक्षाने मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवलेली मुंबई अध्यक्षपदाची धुरा. दक्षिण मुंबईतला उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर ऐन निवडणुकीच्या काळात संपूर्ण मुंबईची जबाबदारी सोपवली गेल्याने तो नक्की कुठे कुठे लक्ष देणार, अशी चिंता काँग्रेसमधील वरिष्ठ मंडळीच व्यक्त करत आहेत.
विकासकामांत शिवसेना आघाडीवर
खासदार अरविंद सावंत यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडून ते सोडवण्यात यश मिळवले आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त रोज दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱया लाखो लोकल प्रवाशांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा दिला. लोकसभेत लोकांचे सर्वाधिक प्रश्न मांडणारे खासदार म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. शिवसेनेच्या त्या कार्यापुढे काँग्रेसची कामे नगण्य ठरली आहेत किंबहुना मिलिंद देवरा हे मुरली देवरांसारखे काम करण्यात तोकडे पडले आहेत.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी
यावेळी काँग्रेसला या मतदारसंघात अंतर्गत गटबाजीने हैराण केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून संजय निरुपम यांच्या कामकाजावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. हे मतभेद इतके विकोपाला गेले होते की स्थानिक नेत्यांनी निरुपम यांना हटवण्याची मागणी काँग्रेस श्रेष्ठाRकडे केली होती. नुकतेच निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक केली गेली. महत्वाचे पद मिळाले पण स्वतŠ लोकसभा उमेदवार असलेले आणि यापूर्वी खासदार असतानाही संपूर्ण दक्षिण मुंबई मतदारसंघात न फिरलेले देवरा हे मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करू शकतील का याबद्दल काँग्रेसींनाच संशय आहे. देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन पक्षाने घोडचूक केली असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.
मुस्लिम मते ‘एमआयएम’कडे
दक्षिण मुंबईतील काँग्रेसची दुसरी अडचण म्हणजे ‘एमआयएम’. एमआयएम या पक्षाने काँग्रेसची एकगठ्ठा मुस्लिम मते स्वतŠकडे वळवली आहेत. त्याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीत आला. भायखळा मतदारसंघातून एमआयएमचा आमदार निवडून आला. यावेळी तर एमआयएमबरोबर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीनेही हातमिळवणी केली आहे. आघाडीने दक्षिण मुंबईत आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्याला दलित मतांबरोबर मुस्लिमांचीही मते मिळतील आणि त्याचा फटका काँग्रेसला म्हणजेच देवरा यांना सर्वाधिक बसेल यात वादच नाही.


























































