
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभेमध्ये 2014 साली निवडून आलेल्या खासदारांपैकी 83 टक्के खासदार करोडपती तर 33 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती एडीआर इंडियाने दिली आहे. एडीआरने ही माहिती आपल्या वेबसाईटवरून जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार 2009 च्या तुलनेमध्ये संसदेतील करोडपती खासदारांची संख्या 24 टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने 2014 साली निवडून आलेल्या 543 पैकी 521 खासदारांच्या नामनिर्देशन पत्राचे विश्लेषण केले. या विश्लेषणानंतर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार संससदेतील 521 खासदारांपैकी 430 म्हणजेच 83 टक्के खासदार करोडपती आहेत. यात भाजपचे 227, काँग्रेसचे 37 आणि अन्नाद्रमुपच्या 29 खासदारांचा समावेश आहे. तसेच लोकसभेमध्ये उपस्थित प्रत्येक खासदाराची सरासरी संपत्ती 14 कोटींच्याही पुढे आहे. तर 32 खासदारांकडे 50 कोटींच्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. तर फक्त दोनच खासदारांची संपत्ती ही पाच लाखांपेक्षाही कमी आहेत. एडीआरच्या आकडेवारीनुसार भाजपच्या 281 खासदारांपैकी 84 टक्के खासदार करोडपती आहेत, तर काँग्रेसच्या 44 खासदारांपैकी 80 टक्के खासदार करोडपती आहेत.
तसेच लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांपैकी 33 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचेही एडीआरने आपल्या आकडेवारीत नमूद केले आहे. यातील 106 खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, समाजात तेढ निर्माण करणे, अपहरण आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर 10 खासदारांवर हत्येच्या गुन्ह्याची नोंद आहे. यापैकी चार खासदार भाजपचे आहेत,तर काँग्रेस, राष्ट्रवादी, एलपीजी, राजद आणि स्वाभिमान पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे, तर एक खासदार अपक्ष आहे. तर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 14 खासदारांवर गुन्ह्याची नोंद आहे. यात भाजपचे आठ, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे.

























































