
सामना प्रतिनिधी । परभणी
शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ येत्या 15 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्या शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेटमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री संजय राठोड, राम शिंदे यांच्याही परभणीत जाहीर सभा होणार आहेत, अशी माहिती युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठलराव रबदडे, गंगाखेडचे अॅड. तांदळे, सूर्यकांत हाके, बालाजी देसाई, माणिक पोंढे आदीसह शिवसेना-भाजप युतीचे अनेक पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना खासदार तथा लोकसभा उमेदवार संजय जाधव म्हणाले, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील 30 गावात आपला दौरा झाला. परतूर, परभणी ग्रामीण, सेलू, मानवत, पालम, पूर्णा आदी तालुक्यात आपणास जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मागच्या निवडणुकीपेक्षाही यावेळी जास्त मताधिक्य देऊ, असे मतदार उघडपणे बोलत आहेत. विरोधकांची नाराजी असल्याने आपल्यापेक्षा विरोधकांनीच आपले वातावरण निर्माण केले आहे. यासर्व चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. शिवसेना-भाजप व अन्य घटक पक्षांची आमची महायुती आहे. कोणीही नाराज नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना परभणीत महायुतीचा जनसागर लोटलेला सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी आपणास जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

























































