
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई महानगरपालिकेत 93 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे आणखी दोन नगरसेवक वाढल्याने ही संख्या आता 95 होणार आहे. कारण भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे संबंधित प्रभागातील शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार विजयी ठरणार आहेत. तर एका प्रभागात काँग्रेसचा दुसऱ्या क्रमांकावरील नगरसेवक विजयी ठरणार असल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 30 होणार आहे.
जात पडताळणी समितीने भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यामुळे संबंधित प्रवर्ग आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपले पद धोक्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय दिला. यामुळे प्रभाग क्र. 28 मधील काँग्रेसच्या राजपती यादव, प्रभाग क्र. 76 मधील भाजपच्या केशरबेन पटेल आणि प्रभाग क्र. 81 मधील मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता पालिकेच्या महासभेत महापौर याबाबतची अधिकृत घोषणा करून संबंधितांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा करतील. त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे शंकर हुंडारे आणि संदीप नाईक तर काँग्रेसचे नितीन सलाग्रे यांना विजयी म्हणून घोषितही करण्यात येईल.
म्हणूनच झाली कारवाई
निवडून आल्यानंतर नगरसेवकांना एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, मात्र जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे संबंधित नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. याविरोधात संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु भाजपच्या केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव या तीन नगरसेवकांच्या याचिका न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या.
पालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
- शिवसेना 93
- भाजप 85
- काँग्रेस 30
- राष्ट्रवादी काँग्रेस 9
- समाजवादी 6
- एमआयएम 2
- ‘मनसे’ 1
- एमआयएम 2
- एकूण 227


























































