
>> वैजनाथ महाजन
शिशिरात पानगळ सुरू होते आणि झाडांचे झाडोरे होऊ लागतात. सृष्टीचा हा औदासीन्याचा काळ सरतो आणि या साऱया झाडांवर पालवी तरारू लागते. कोवळी गुलजार पानं दिसामासाने वाढू लागतात. रंग बदलू लागतात आणि या चैत्रपालवीने साऱया सृष्टीला न्याराच रंग लाभतो. चैत्रांगणाची ओढ लावणारा हा चैत्रोत्सव म्हणजे सृजनाचा मास. निसर्गाला आगळीवेगळी झळाळी देण्याची किमया चैत्रमासात घडते. असे हे चैत्राचे आणि चैतन्याचे जीवाभावाचे नाते दर्शवणारा हा चैत्रोत्सव अनुभवूया.
दारी गुढी उभारली की, आपला चैत्रोत्सव सुरू होतो. अंगावर पिवळीजर्द आणि जमिनीला खरपूस भागून काढणारी उन्हे घेत घेत चैत्र मास सृष्टीला सामोरा जातो आणि सृष्टी, पण त्याचा झोका उंच उंच जावा याकरिता त्याचे त्याच उत्साहात स्वागत करू लागते. गुढीपाडवा हा आपल्या हिंदुस्थानातील एक अपूर्व आणि तितकात अद्भुत असा विजयोत्सव आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीत परतले. त्यांच्या स्वागताचा सोहळा म्हणजेच गुढीपाडवा.
या पाडव्याच्या साक्षीनेच आपल्या दारी मुली चैत्रांगण रेखू लागतात आणि चैत्राचे हळदीकुंकू साऱया चैत्रभर सुरू असते. बाजारात कैऱया आलेल्या असतात. दारी व वाटेवरी उभी असलेली आंब्याची झाडे पण कैऱयांनी लगडलेली असतात आणि शाळकरी पोरं दगडांनी त्या पाडून गट्ट करण्याकरिता झटू लागलेली असतात. चैत्र येतो आणि येणाऱया आंब्याचा सुगंध आपणाला सांगून जात असतो, ‘‘आता आमरसाच्या पैजा लावण्यासाठी सिद्ध व्हा!’’ असे पण बजावत असतो. चैत्राची अशा पद्धतीने चाहूल लागताच दारी डुलत असलेला मोगरा पण त्याची शुभ्र फुले उधळू लागतो आणि दहा-पंधरा दिवसांतच दारीचा मोगरा फुलांच्या भाराने हसरा चेहरा करून आणखी फुलांचा वर्षाव करू लागतो. चैत्राच्या साक्षीनेच पांढरी तगर फुलू लागते आणि तिची ती जाडसर फुले महादेवाला वाहण्यासाठी गृहिणींची धावाधाव सुरू होत असते. बाहेर उन्ह तर उभे असतेच असते, पण चैत्राच्या सौजन्यामुळेच ते जीवाची काहिली करत नसते आणि त्यातून त्याने तशी काहिली केली तरी ती आपणांस चैत्रसुखच वाटत असते.
चैत्र म्हटलं की, चैत्रपालवी ही ओघानेच येत असते आणि चैत्राची आपल्या मनातील उत्सुकता आणखी वाढीस लागत असते. शिशिरात पानगळ सुरू होते आणि झाडांचे झाडोरे होऊ लागतात. प्रत्येक झाडाला वीरगती आल्यासारखे ते सुनसान वाटू लागते. जी अगोदरच वठलेली असतात ती आणखीच ओकीबोकी वाटू लागतात. झाडांच्या संरक्षणाखाली त्यांनाच लपेटत असलेल्या वेली पण अवसान गळून गेल्यासारख्या पडून राहत असतात. एकूणच सृष्टीचा हा तसा साऱया औदासीन्याचाच काळ असतो असे पुनः पुन्हा झाडांकडे पाहून वाटत असते आणि मग कधीतरी याच साऱया झाडांना पालवी तरारू लागते, दिसामासाने वाढू लागते. कोवळी गुलजार पाने दिवसादिवसाने मोठी होऊ लागतात, रंग बदलू लागतात आणि बहुतेक साऱया झाडांवर एक वेगळीच झळाळी चमकू लागते. रानात पळस फुलतो आणि दारात मोगरा फुलतो. कोकणात तर अवघा कायापालट झाल्यासारखेच चैत्रबिलोरी असे देखणे चित्र दिसू लागते. कोकणचा मेवा स्वाह मनोहर होऊ लागतो आणि शहरी करवंदे काळी होऊ लागतात. आता कोकणची मैना भरभरून इकडे तिकडे होऊ लागते आणि काही दिवसांतच गाण्यामधली पिकली करवंदं डोईवरून नागर प्रांतात येऊ लागतात. मुले तर त्यावर तुटून पडतातच पडतात, पण प्रौढांना पण काही त्यांचे वावडे नसते. पिकल्या झाडाची जांभळे पण रसाळ गोमटी होऊन घराघरांना हाका मारू लागतात आणि त्यांचे पण तितक्याच जोमात स्वागत होऊ लागते. हळूहळू चैत्रातून जांभूळ, करवंदाचे दिवस उगवू लागतात आणि बालगोपाळ त्याच आनंदात चैत्राच्या उन्हात न्हाऊ लागतात, बागडू लागतात. या बालगोपाळांना उन्हाचा तडाखा जाणवत नसतो आणि तसा तो जाणवण्याचे कारण पण असत नाही. आता चहाची जागा पन्हे घेऊ लागतात. त्याचा थंडावा भल्या भल्यांना हवाहवासा वाटू लागतो.
याच चैत्राच्या दिवसांत गावोगावी जत्रा भरू लागतात आणि ग्रामदैवतांच्या पालख्या गावभर फिरून मंदिरी येत असतात. कर्णकर्कश आवाजाने तरुणाई या गावातून त्या गावाला जत्रेच्या नावाखाली मटन चाखण्यासाठी जात असते. काही काही गावांत मात्र चैत्राचा नैवेद्य हा गोडाचा असतो आणि तो त्याच भक्तिभावाने बनवला जात असतो. चैत्रातच दख्खनचा राजा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या ज्योतिबाची अलोट गर्दीची यात्रा भरत असते. आणि ज्योतिबाच्या डोंगरावर सर्वत्र दवणा दरवळू लागलेला असतो. अशा साऱया या धामधूमीत जीवाच्या काहिलीकडे पाहायला वेळ तरी कुणाकडे असतो आणि त्याची खातरजमा करण्याकरिता कोण तिष्ठत बसलेला असतो? चैत्र उगवला म्हणजे येताना तो तळपत्या सूर्यनारायणाला घेऊनच उगवणार हा परिपाठ तर आपणा सर्वांनाच ठाऊक असतो. मग कधीतरी सोसाटय़ाचा वारा येणार आणि मागून वळीव पण येणार आणि सगळ्यांनाच गारेगार करून सोडणार. असा पण चैत्राचा महिमा असतो. कुठे वळवाचा हलकासा शिरकाव तर कुठे गारांचा टणटणा असा मारा. असा चैत्राचा मामला असतो.
या साऱयात सदैव दाटून येत असते ते एक अनोखे चैतन्य. या स्वयंभू अशा चैतन्यामुळेच चैत्रातले उन्ह कधी रणरणत नाही. कधी ते तळपल्यासारखे होऊन जात नाही. कारण रस्त्याच्या कडेला करंजाची हिरवीगार पालवी पसरलेली असते. करंजाचे झाड हे तिन्ही त्रिकाळ हिरव्याकंच पानांनीच लगडलेले असते. या झाडाची हीच आगळीवेगळी किमया चैत्रात बहराला येत असते आणि त्याच्या पानातूनच डोंगरची मैना आपल्या दारी उतरत असते. म्हणून तर चैत्रोत्सव हा सृजनाचा मास असतो. सृष्टी चैत्राला हिंदोळ्यावर झोके देत असते आणि चैत्रगाणे गात असते. म्हणून तर चैत्राचे आणि त्याच्या चैतन्याचे असे जीवाभावाचे नाते निर्माण झालेले असते. तेही दारी उभारलेल्या गुढीच्या साक्षीने!




























































