
सामना प्रतिनिधी। मुंबई
ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका मुंब्रा खाडीवरून एलिवेटेड मार्गाने काढण्यात येत आहे, मात्र खाडीतील तिवरांच्या पट्टय़ावर प्रकरण बारगळले होते. अखेर पर्यावरण खात्याने कामाची मंजुरी दिली. त्यानंतर तरी कामाने वेग पकडण्याची आशा होती मात्र खाडीत काम करणे कठीण असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) निदर्शनास येत आहे आणि या कामात तरबेज असलेल्या भारतीय रेल्वेची आता त्यांना आठवण येऊ लागली आहे.
मेल-एक्सप्रेस गाडयांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होण्यासाठी मध्य रेल्वेवर एमआरव्हीसीमार्फत कुर्ला ते कल्याणपर्यंत पाचवा-सहावा मार्ग उभारण्याचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ला असा पाचवा आणि सहावा मार्ग तयार होऊनही कैक वर्षे लोटली तरी मधले कळीचे दिवा ते ठाणे हे अवघे 9.8 कि.मी.चे अंतर काही एमआरव्हीसीला गाठता येईनासे झाले आहे. एमआरव्हीसीने पारसिक हिलच्या बोगद्यातून पाचवी आणि सहावी मार्गिका काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन बोगद्याचे अस्तित्व संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आणि अर्ध्या बोगद्यातून एमआरव्हीसीला हात हलवत परतावे लागले.
जमीन नसल्याने क्रॉंसिंगवर भर
हा बोगदा खोदण्यापूर्वी एमआरव्हीसीने तज्ञांकडून काही सर्व्हे केला होता की नाही असा प्रश्न पडला आहे. या बोगद्यावर केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे नवा बोगदा खणावा लागला आहे. कळवा पूर्वेला मोठय़ा इमारतीचे जंगल उभे राहिल्याने फार मोठय़ा लोकसंख्येचे पुनर्वसन करण्याची गरज होती. त्यामुळे कळवा येथे अखेर यार्ड रिमॉडेंिलग करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच आहे त्या रुळांवरच क्रॉसिंग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल गाडय़ांना त्यामुळे क्रॉंिसगचा सामना करावा लागणार आहे. नुकताच यासाठी पॉवर ब्लॉक घेऊन रुळांच्या क्रॉसिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
आणखीन एक ते दीड वर्ष वाट पाहा
या मार्गिकेतील मुंब्य्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग होत आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2019 हे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र पावसाळ्यातील तीन महिने कामे थांबणार आहेत. कारण मालवाहू ट्रक भरतीचे वेळापत्रक पाहून खाडीत शिरत आणि परतत आहेत. अर्थ वर्क, रूळ आणि पोल व ओव्हरहेड उभारण्याची तांत्रिक कामे त्यानंतर करावी लागणार आहे. त्यामुळे आणखीन एक ते दीड वर्ष लागणार आहे.
डेडलाइन पे डेडलाइन
मार्च 2019 ची डेडलाइन पाळली जाणार नाही म्हणून जून 2019 ही नवीन डेडलाइन देण्यात आली होती परंतु कामाची स्थिती पाहता पावसाळा तोंडावर असल्याने ही डेडलाइनसुद्धा पाळली जाणार नसल्याचे म्हटले जाणार आहे.






























































