
सामना ऑनलाईन । लखनौ
देवबंद येथील प्रचारसभेमध्ये मुसलमानांना मतांसाठी आवाहन करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विधानाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सपा-बसपाने मुसलमानांना मतांची साद घातल्याने हिंदुंकडे आता भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही, तसेच देशात दलित-मुसलमान एकता अशक्य असल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी म्हणाले की, ज्या पद्धतीने प्रचारसभेमध्ये मायावती यांनी मुसलमानांकडे मतांची मागणी केली ते पाहता हिंदुंकडे भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा पर्याय नाही. तसेच काँग्रेस, सपा, बसपा यांचा ‘अली’वर विश्वास असेल तर आमचा ‘बजरंगबली’वर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
मायावती यांनी देवबंद येथील पहिल्या प्रचार सभेत मुसलमानांनी फक्त महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे अशी साद घातली होती. या वक्तव्याचा योगींनी समाचार घेत सपा-बसपावर आगपाखड केली. दलित-मुसलमान एकता अशक्य आहे. कारण देश विभाजनावेळी पाकिस्तानने दलित नेत्यांना कशी वागणूक दिली हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. हिंदुस्थानात बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते झाले, परंतु योगेश मंडल हे विभाजनावेळी पाकिस्तानमध्ये गेले. तेथे त्यांनी दलितांवर होणारे अत्याचार पाहिले आणि दु:खी मनाने ते हिंदुस्थानात परत आले, असे योगी म्हणाले. दरम्यान, मायावती यांच्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल मागवला आहे.



























































