
सामना प्रतिनिधी । परभणी
लोकसभा मतदार संघाचे शिवसेना -भाजपा, रासप, शिवसंग्राम, रिपाई (आठवले गट) या महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उद्या गुरुवार, 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे सभा होणार आहे. विजयराजे देशमुख मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे.
शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला असून गुरुवारी सायंकाळी 5 वाजता शिवसेना-भाजपा, रासप, शिवसंग्राम, रिपाई आठवले गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथे ते जाहीर सभेला संबोधीत करतील. या सभेची जय्यत तयारी झाली असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ त्यांची ही पहिली जंगी सभा होणार असून या सभेला घनसावंगी तालुक्यासह संपूर्ण लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप व अन्य संलग्न पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवप्रेमीजनता, शिवसैनिक व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जालना जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे, भास्कर आंबेकर, घनसावंगीचे तालुकाप्रमुख उद्धव मरकड यांनी केले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा
खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्राचारार्थ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 12 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 एप्रिल रोजी स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील वातावरण भगवेमय झाले असून संजय जाधव यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.



























































