Lok sabha 2019 परळी सर्वाधिक ‘हॉट’; तर माजलगाव, केज ‘सायलेन्ट’ मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा मतदार संघासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदान यंत्र मतदान केंद्रावर पोहोचली आहेत. 20 लाख 41 हजार मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. 2325 मतदान केंद्र आहेत. यात शहरी 761 तर 1564 ग्रामिण मतदान केंद्रे आहेत. 37 अतिसंवेदनशिल मतदान केंद्र आहेत. त्यात परळी विधानसभा मतदारसंघात 17 मतदान केंद्र आहेत. गेवराईत 6, आष्टीत 7, बीडमध्ये 3 तर माजलगाव आणि केजमध्ये केवळ प्रत्येक 2 मतदान केंद्र संवेदनशिल आहेत.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वॉर रूम उभारण्यात आली आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, हे वॉररूममध्ये ठाण मांडून असणार आहे. सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहोच झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्राचे अपडेट ऑनलाईन पद्धतीने वॉर रूमला कळवले जाणार आहे आणि वॉररूमच्या निर्देशानुसार यंत्रणा हलणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये 37 मतदान केंद्र अतिसंवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक परळी विधानसभा मतदार संघातील 17 मतदान केंद्राचा समावेश आहे. परळी विंधानसभा मतदारसंघ हॉट तर माजलगाव आणि केज विंधानसभा मतदारसंघ सायलेन्ट मोडवर असणार आहे. कारण माजलगाव आणि केज मतदार संघामध्ये केवळ 2-2 मतदान केंद्रे संवेदनशिल आहे. मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रिघ लागली तर उन लागू नये म्हणून शेड उभारण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान असून रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदारांना उशिर झाला तरी अधिकार बजावता येणार आहेत. त्यामुळे अंतिम आकडेवारी मध्यरात्रीनंतर उपलब्ध होणार आहे. निवडणुकीच्या कालावधीत 2 कोटी 89 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. तर 61 हजार 50 लिटर दारू ही जप्त केली आहे.

मतदानाचा अधिकार बजावा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
निवडणूक लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. आपल्या एक मतामुळे देशात सरकार स्थापन होणार आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी याची जाणिव मतदारांनी ठेवली पाहिजे, प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.