
सामना ऑनलाईन । मुंबई
सहा वर्षांच्या मुलाचे जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून अपहरण करणाऱ्या पित्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी तपास करून त्या मुलाची सुटका केली.
तक्रारदार महिला या मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. त्यांच्या बहिणीचे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. मुलाच्या जन्मानंतर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या पत्नीला कावीळ झाल्याने तिचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा ताबा मिळावा म्हणून तक्रारदार महिलेने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने मुलाचा ताबा हा तक्रारदार महिलेकडे सोपवला होता. पित्याला त्याच्या मुलाला दर रविवारी भेटण्यास परवानगी दिली होती. गेल्या वर्षभरापासून तक्रारदार महिला या त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवत होत्या. सायंकाळी पिता त्याच्या मुलाला तक्रारदार महिलेकडे सोडायचा. 12 जानेवारीला तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे जोगेश्वरी स्थानकात आल्या व त्या मुलाला पित्याकडे सोपवून निघून गेल्या.
सायंकाळी त्या जोगेश्वरी स्थानकात आल्या, मात्र मुलगा आणि त्याचा पिता हे दोघेही आले नसल्यामुळे तक्रारदारांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर महिलेने न्यायालयात पुन्हा धाव घेतली. न्यायालयाने अंधेरी रेल्वे पोलिसांना पित्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सहायक आयुक्त सुधीर जांबवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या पथकातील राजेंद्र कुडवलकर, दळवी, कळसाईत यांनी तपास सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान पित्याला वांद्रे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मुलाला महालक्ष्मी येथील एका आश्रमात ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या मुलाला त्या आश्रमातून ताब्यात घेतले. पित्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुलाचा ताबा तक्रारदार महिलेकडे देण्यात आला.
























































