
सामना ऑनलाईन । सांगली
‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाचा प्रयोग सुरू असतानाच सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच भोवळ येऊन कोसळले. सांगलीतील विष्णुदास भावे नाटय़मंदिरात हा प्रकार दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या प्रयोगादरम्यान झाला. तातडीने वैभव मांगले यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सांगली येथील विष्णुदास भावे नाटय़मंदिरात ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाचा प्रयोग दुपारी 4 वाजता सुरू झाला. या नाटकात प्रमुख भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांना प्रयोग सुरू असतानाच अचानक चक्कर आली आणि रंगमंचावरच ते कोसळले. त्यांना तातडीने सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मी ठणठणीत, अफवांवर विश्वास ठेवू नका!
रात्री उशिरा वैभव मांगले यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणाले, अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोग सुरू होता. दुर्दैवाने सांगलीत तापमान 42 अंश सेल्सियस होते. प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच या नाटय़गृहात एसी नसल्याने श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. नाटक संपायला 10 मिनिटे बाकी असताना मी स्टेजवर कोसळलो. आता माझी प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.





























































