
सामना प्रतिनिधी । उरण
मागील 33 वर्षींपासुन करंजा कोंढरी पाड्यातील पाणी टंचाई दुर करण्यात शासकीय यंत्रणा, राजकीय पुढारी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ येथील आगरी कोळी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला.
उरण तालुक्यातील करंजा-कोंढरीपाडा हे गाव पाणी टंचाईने त्रस्त आहे. मागील 33 वर्षींपासून 1500 लोकवस्तीचे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. सध्या चाणजे ग्रामपंचायतीमार्फत 15 ते 20 दिवसांनी फक्त एक तास पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तोही अनियमित, अपुरा आणि दुषित असतो. नागरिकांना पुरेसे व नियमितपणे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीपासून राज्यसरकार पर्यंत ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीला शासकीय स्तरावरून वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. नव्याने निर्माण झालेल्या वसाहती, नगरांना चाणजे ग्रामपंचायतीकडून मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील 33 वर्षींपासुन मागणीनंतरही करंजा कोंढरी पाड्यातील पाणी टंचाई दुर करण्यात शासकीय यंत्रणा, राजकीय पुढारी अपयशी ठरली असल्याचा आरोप येथील समाजसेवक ग्रामस्थ विनायक पाटील यांनी केला आहे.
मागील 33 वर्षींपासुन करंजा कोंढरी पाड्यातील पाणी टंचाई दुर करण्यात शासकीय यंत्रणा, राजकीय पुढारी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ येथील आगरी कोळी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. पाणी टंचाई दूर केल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणूकीत मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही विनायक पाटील यांनी माहिती देताना सांगितले.
मात्र मतदानावर मतदारांनी बहिष्कार टाकल्याची गंधवार्ताही येथील निवडणूक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसुन येत आहे. कारण दुपारी तीन वाजता उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी विविध मतदान केंद्रावर मतदान सुरळीतपणे आणि शांततेत सुरु असल्याचा दावा केला होता.



























































