उत्पादन कमी असूनही काजू बीयांचे दर गडगडलेलेच, किलोचा दर फक्त 100 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बीयांचे उत्पादन निम्म्याहून कमी असतांना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढे घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्रायल येथून काजू बीयांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असल्याने प्रत्यक्ष कोकणात यावर्षी काजू बीयांचे उत्पादन घटूनही दर गडगडले असल्याचे दिसून येत आहे. काजू बीयांच्या विक्रीतून आर्थिक गणित मांडणाऱ्यांचे यावर्षीचे अंदाज साफ चुकले आहेत. यावर्षीचा काजू बीयांचा हंगाम जवळपास संपण्याच्या मार्गावर असतांना दराने मात्र बाजारपेठेत अद्यापही ऊसळी घेतलेली नाही.

गतवर्षी वातावरणाची उत्तम साथ मिळाल्याने काजू बीयांचे उत्पादन मुबलक झाले होते. उत्पादन वाढले की, साहजिकच दर घसरतो ही बाजारपेठेतील गणिते असतात. मात्र गतवर्षी काजू बीयांचा दर किलोला 155 रुपयांवर जावून पोहोचला होता. एवढ्या चढ्या दराने काजू बी खरेदी होत असतांना हा दर अखेर पर्यंत स्थिर होता हे विशेष. किलोला 155 रुपये मोजून खरेदी केलेली काजू बी काजूगर तयार करणाऱ्या उत्पादकांना खरेदी करणे अक्षरशः आवाक्याबाहेर गेले. साधारणपणे एक किलो काजू बी मधून प्रक्रीयेनंतर 200 ग्रॅम काजूगर तयार होतात. याचाच अर्थ एक किलो काजूगर तयार होण्यासाठी पाच किलो बियांवर प्रक्रीया करावी लागते. गतवर्षी एक किलो काजूगर तयार होण्यासाठी 775 रुपयांच्या काजू बीया लागत होत्या. त्यानंतर त्याचा प्रक्रीया खर्च, मार्केटिंग हे सर्व लक्षात घेता काजूगर विकायचे कोणत्या दराने हा उत्पादकांना मोठा प्रश्न पडला होता.

यावर्षी अपेक्षित थंडी पडूनही काजूला आवश्यक तेवढा मोहोर आला नाही. बऱ्याचदा पहिल्या मोहराच्या बीया तयार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मोहोर येतो असेही यावर्षी घडले नसल्याने काजू बीयांचे उत्पादन कमालीचे घटले. सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत ओले काजूगर 250 रुपये शेकडा या दराने मिळू लागले तोच दर अखेरपर्यंत कायम राहीला. याच धर्तीवर सुक्या काजू बीयांनाही उत्तम दर मिळेल आणि उत्पादन कमी असल्याने गतवर्षी पेक्षा थोडा अधिक दर मिळेल या आशेवर असणाऱ्या काजू उत्पादकांच्या पदरी चांगलीच निराशा पडली. सुरुवातीला सुकी काजू बी 113 रुपये किलो या दराने खरेदी केली जात होती. दर वाढेल या अपेक्षेने छोट्या काजू उत्पादकांनी वाट पाहिली मात्र हाच दर वाढण्या ऐवजी तीन रुपयांनी कमी होवून 110 रुपये किलोवर स्थिरावल्याने अधिक नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे.