लेख : ‘फाईव्ह जी’ आणि बदलणारी बाजारपेठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सनतकुमार कोल्हटकर<<

[email protected]

जगभरात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातही फोनवरील संभाषणापेक्षा डेटा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सध्या या डेटा वापरामध्ये एक समस्या अशी आहे, एखादी ध्वनिचित्रफीत  डाऊनलोड अजूनही पुरेशा वेगाने होत नाही. ‘फोर जी’ तंत्रज्ञानामुळे डेटा पाठवणे पूर्वीपेक्षा वेगवान झाले असले तरी अजूनही त्याचा वेग जास्त होणे अपेक्षित आहे. पहिल्यांदा पुरेसा सिग्नल उपलब्ध होणे आणि नंतर व्हिडीओ डाऊनलोड या दोन्हीमध्ये जाणारा वेळ यावर लवकरच ‘फाईव्ह जी’चा उतारा बाजारात येत आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये एटी ऍण्ड टी, व्हेरिझॉन, एरिक्सन या कंपन्यांनी ‘फाईव्ह जी’ सुविधा सुरू केल्याही आहेत. ‘फाईव्ह जी’साठी लागणारी उपकरणे व तंत्रज्ञान या सर्व कंपन्यांकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी जोरदार व्यापारयुद्ध अपेक्षित आहे.

‘टू जी’ तंत्रज्ञानात व्हॉईस व एसएमएससाठी सुविधा उपलब्ध होती. मग ‘थ्री जी’मुळे इंटरनेटही स्मार्टफोनवर उपलब्ध झाले. त्याच इंटरनेटचा वेग आणि व्हिडीओ डाऊनलोडचा वेग ‘फोर जी’ तंत्रज्ञानात वाढला. ‘फाईव्ह जी’मध्ये प्रत्येक गिगाबाईटची किंमतही ‘फोर जी’पेक्षा खूपच कमी होणार आहे. आता मोबाईल फोनचा वापर लॅपटॉपमधील अनेक गोष्टींकरिता पर्याय म्हणून सुरू झाला आहे. येणाऱ्या काळात स्मार्टफोनचा वापर वाढत जाणार असल्याने त्याच्या बाजारपेठेकडे जगातील अनेक मोठय़ा कंपन्यांचे लक्ष गेले आहे. त्यामुळेच चीनमधील हुवेई कंपनीच्या संचालिकेला कॅनडामधून अटक करण्यात आली. चीनने ‘फाईव्ह जी’च्या येणाऱ्या जागतिक बाजारपेठेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे, पण या तंत्रज्ञानातील अनेक पेटंट्स क्वालकॉमसारख्या अमेरिकन कंपन्यांकडे आहेत. त्यामुळे स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांना अशा कंपन्यांना मोठी फी द्यावी लागेल हे निश्चित. अमेरिकेत ऍपल कंपनीला ‘फाईव्ह जी’च्या वापरासाठी लागणारी उपकरणे व स्मार्टफोन विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारचे पुरेपूर प्रोत्साहन आहे, पण ऍपल कंपनीने त्यासाठी पुरेशी तयारी केली नसल्याचे सांगण्यात येते, पण चीनच्या हुवेई कंपनीने ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानावर चालणारी उपकरणे व स्मार्टफोन बनविण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे. ऍपल  कंपनीकडे मर्यादित जागतिक बाजारपेठ असल्याने व हुवेईने संपूर्ण बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याने या दोन्हीही कंपन्यांमध्ये या नवीन बाजारपेठेवर ताबा मिळविण्यासाठी तुंबळ चढाओढ असेल.

‘फाईव्ह जी’ ही संज्ञा आहे फिफ्थ जनरेशनचा शॉर्टफॉर्म. ‘फाईव्ह जी’ या हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्हज् आहेत (30 ते 300 गिगाहर्टझ्). या वेव्हज्ची बॅन्डविड्थही खूपच वाईड आहे. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञाच्या मदतीने दोन तासांची ध्वनिचित्रफीत डाऊनलोड (उतरून घेण्यासाठी) किमान सहा मिनिटे लागतात, पण ‘फाईव्ह जी’च्या वापरामुळे तीच ध्वनिचित्रफीत फक्त 3.6 सेकंदांत उतरून घेता येईल. म्हणजे ‘फोर जी’पेक्षा 100 पट जास्त वेग. ‘फाईव्ह जी’मध्ये एका सेकंदात 10 गिगाबाईट या वेगाने ध्वनिचित्रफीत उतरून घेता येईल. या बेफाट वेगामुळे सिग्नलमधील सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल. नुकत्याच बार्सिलोना, स्पेनमध्ये भरलेल्या  मोबाईल कॉन्फरन्सच्या जागतिक प्रदर्शनात जागतिक बडय़ा कंपन्यांनी ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपयोगितेचे प्रदर्शन मांडले होते. मग त्यात  कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ड्रायव्हरविरहित गाडय़ा या प्रामुख्याने प्रदर्शित केल्या गेलेल्या होत्या. या वरील सर्व गोष्टी या सिग्नलच्या सातत्यावर आधारित आहेत हे सांगायला नकोच. यादरम्यान बार्सिलोनातील एक संपूर्ण स्टेडियम ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले.

मागील महिन्यात चीनने शांघाय शहरातील एका विभागात ‘फाईव्ह  जी’च्या चाचण्या सुरू केल्याचे बोलले जाते, तर दक्षिण कोरिया व अमेरिकेमध्येही ‘फाईव्ह जी’च्या व्यावसायिक सेवेला सुरुवात झाली आहे. चीनच्या  हुवेईकडून जगामध्ये ‘फाईव्ह जी’च्या पायाभूत सुविधेच्या प्रसारासाठी पुरेपूर तयारी झाल्याचे सांगतात. चीनने ‘फाईव्ह जी’च्या प्रसारामध्ये पुरेपूर आघाडी घेतली आहे, पण अमेरिकेकडून या ‘फाईव्ह जी’च्या पायाभूत सुविधेच्या बाजारावर ताबा मिळविण्यासाठी तेवढय़ा आक्रमकतेने हालचाली सुरू झालेल्या नाहीत असे म्हटले तर वावगे होणार नाही. ‘फाईव्ह जी’च्या पायाभूत सुविधेवर चौथी औद्योगिक क्रांती, ड्रायव्हरविरहित गाडय़ा अशा अनेक नवीन तंत्रज्ञानाची मालिका उभी आहे. ‘फाईव्ह जी’ हे आता बेफाट वेगाचे भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञान आहे. अमेरिकेने ‘फोर जी’ तंत्रज्ञान प्रसारावेळी आक्रमक धोरण राबविले होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीही घेतली होती. अमेरिकेत ‘फाईव्ह  जी’च्या रेडिओ लहरींसाठी जो  स्पेक्ट्रम बँड  निश्चित करण्यात आला आहे तो तेथील संरक्षण विभागासाठी राखून ठेवण्यात आला असल्याने अमेरिकन सरकारला तो स्पेक्ट्रम बँड नागरी आणि व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे अमेरिकेत या अडचणींवर काय मार्ग काढला जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबद्दल तिथे लवकर निर्णय झाला नाही तर ‘फाईव्ह जी’च्या तंत्रज्ञान प्रसारात अमेरिका पिछाडीवर पडेल असे अमेरिकेतील संरक्षण विभागाला वाटते. त्यामुळे अमेरिका त्याच्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया  व युरोपातील मित्रदेशांना ‘फाईव्ह जी’च्या प्रसारासाठी कोणत्याही चिनी कंपन्यांची मदत घेऊ नये असे सांगत आहे. चिनी दूरसंचार कंपन्या (हुवेई / झेडटीई) व चीनमधील लष्कर यांचे लागेबांधे लक्षात घेता अमेरिकेने ‘डेटा’ सुरक्षेसाठी सावधानता बाळगली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे माजी प्रमुख जेम्स क्लेपर व नाटोचे युरोपातील माजी कमानदार जेम्स स्टेव्हरिडिस यांनी अमेरिकन सरकारला त्यासाठी निवेदन दिले आहे. याच महिन्यात दक्षिण कोरियातील सॅमसंग या कंपनीने पहिलावहिला ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानावर आधारित अँड्रॉईड फोन बाजारात आणत असल्याची घोषणा केली आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी एस 10’ हे ते पहिले मॉडेल बाजारात येत आहे. अमेरिकेत व्हेरिझॉन कंपनीकडून ‘फाईव्ह जी’ लहरींची सुविधा या फोनला उपलब्ध होईल. अर्थात अमेरिकेतही काही भागातच व्हेरिझॉन आणि एटी ऍन्ड टी या कंपन्यांनी ‘फाईव्ह जी’ लहरींची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2020च्या उत्तरार्धात ‘फाईव्ह जी’च्या प्रसाराला वेग येईल असे दिसते आहे.

‘फाईव्ह जी’ या हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्हज् आहेत. चीनमध्ये  2019 या वर्षाच्या उत्तरार्धात ‘फाईव्ह जी’चा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू होईल. चीनमधील चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि  चायना टेलिकॉम या तीन कंपन्या या ‘फाईव्ह जी’च्या प्रसारासाठी सज्ज झाल्या आहेत. आतापर्यंत ‘फोर जी’ सिग्नल्सच्या प्रसारणाकरिता मोठाले टॉवर्स मोठय़ा अंतरांवर बसविण्यात येत असत, परंतु ‘फाईव्ह जी’च्या सिग्नल्समध्ये सातत्य राखण्यासाठी छोटे टॉवर्स हे लहान लहान अंतरांवर बसविणे गरजेचे आहे. ‘फोर जी’च्या टॉवर्ससहीत  कुठल्याही उपकरणांचा ‘फाईव्ह जी’मध्ये उपयोग असणार नाही. त्यामुळे पूर्णपणे नव्याने ‘फाईव्ह जी’च्या टॉवर्सची उभारणी करावी लागेल. ‘फोर जी’च्या दोन टॉवर्सच्या बदल्यात किमान ‘फाईव्ह जी’चे छोटे 50 किमान टॉवर्स बसवावे लागतील. उदाहरणच द्यायचे झाले तर बसमधून जाताना ‘फाईव्ह जी’च्या सिग्नल्सचे सातत्य राखण्यासाठी रस्त्यातील प्रत्येक विजेच्या खांबावर प्रत्येकी एक-एक छोटा टॉवर बसवावा लागेल. पुढील वर्षी चीन ‘फाईव्ह जी’चा व्यावसायिक वापर उपलब्ध करून देण्यावर ठाम असून त्यासाठीची तयारी झाली आहे. ‘फाईव्ह जी’च्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी जगातील चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, कॅनडा आणि सिंगापूर हे देश सज्ज झालेले आहेत. एरिक्सन कंपनीला तर बहारीन, युनायटेड अरब अमिराती, कतार, सौदी अरेबियाकडून ‘फाईव्ह जी’साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे मोठे कंत्राट मिळालेलं आहे. त्यामुळे युनायटेड अरब अमिराती हा सर्वात आधी ‘फाईव्ह जी’ वापरासाठी सज्ज होईल असे वाटते. त्यापाठोपाठ सिंगापूरचाही नंबर लागेल असे दिसते. त्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर त्यासाठी ‘फाईव्ह जी’ स्मार्टफोनही वेगळे लागतील. त्यामुळे त्याचीही मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हिंदुस्थानात अजून तरी ‘फाईव्ह जी’च्या ट्रायल अंमलबजावणीसाठीही काहीही हालचाल नाही. अजून ‘फोर जी’च हिंदुस्थानमध्ये पूर्णपणे पोहोचलेले नाही.