सुवर्ण मंदिर नव्हे; श्री अमृतसर म्हणा : अकाल तख्तचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला आज बैसाखीनिमित्त रोषणाई करण्यात आली होती.

सामना ऑनलाईन । अमृतसर

शीखांनी आपल्या प्रमुख धर्मस्थळाला सुवर्ण मंदिर, गोल्डन टेंपल असे संबोधू नये, त्याऐवजी सचखंड श्री हरमंदिर साहब, श्री दरबार साहिब किंवा श्री अमृतसर या नावाने संबोधावे असे आवाहन जगभरातील शीखांना त्यांची सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या अकाल तख्तने केले आहे. राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका फलकावर सुवर्ण मंदिर असे लिहिल्याने अकाल तख्तने त्यावर आक्षेप घेत हे आवाहन केले आहे. गोल्डन टेंपल या नावाशी धार्मिक भावना जुळत नसल्याने तख्तच्या प्रमुखांनी हे आवाहन केले आहे.

श्री दरबार साहिब हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. ‘गोल्डन टेम्पल’ असा उल्लेख केल्यास या नावाशी धार्मिक भावना जुळत नाहीत. त्यामुळे या स्थानाचा उल्लेख श्री अमृतसर, सचखंड श्री हरमंदिर साहब, श्री दरबार साहिब असा करावा असे अकाल तख्तचे प्रमुख ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी सांगितले. हे आवाहन करण्यासोबतच अकाल तख्तने सिरसा डेराच्या एका अनुयायाने टाकलेल्या फेसबुक पोस्टवरही आक्षेप घेतला आहे. या अनुयायाने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये शीखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची तुलना डेरा प्रमुख गुरमीत रामरहिमशी केली आहे. धार्मिक स्थळाचा आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्या अनुयायावर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश अकाल तख्तचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत पंजाबच्या डीजीपींना पत्र पाठवले असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.