आंबोली घाटात राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवारी (1 मे रोजी) रात्री 8 वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ थरारक पाठलाग करत अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतूकिवर कारवाई केली आहे. या कारवाईत 10 लाख 22 हजार 400 रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण 26 लाख 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित राजकुमार बाबुराव चव्हाण (38) रा. कोलगाव, सावंतवाडी व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (28) रा. वेंगुर्ले यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सावंतवाडी बेळगाव या मार्गावरुन अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या टिमने बुधवारी (1 मे रोजी) सायंकाळ पासून सावंतवाडी बेळगाव रोडवर सापला रचला होता. त्यानुसार रात्री 8 च्या सुमारास या पथकाने आंबोली घाटात स्विफ्ट कार (एम.एच. 02 बी.डी. 2979) आणि इनोव्हा कार (एम.एच. 14 एएन. 3033) या गाड्यांना या पथकाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र त्या न थांबता सुसाट वेगाने पुढे निघुन गेल्या. त्यामुळे या दोन्ही कारचा पाठलाग करून आंबोली मुख्य धबधब्याजवळ अडविण्यात आले. त्यांची तपासणी केली असता स्विफ्ट कार मध्ये 750 मिमी बॉटल असलेले दारुचे 60 बॉक्स तर इनोव्हा कारमध्ये 180 मिमी बॉटल असलेले दारुचे 92 बॉक्स असे 10 लाख 22 हजार 400 रूपये किमतीचे 152 बॉक्स आढळून आहे. त्या दारूसह 16 लाख 30 हजारांची दोन वाहने असा एकूण 26 लाख 52 लाख 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्या प्रकरणी कार चालक राजकुमार बाबुराव चव्हाण व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील चौकशी साठी 7 दिवसात येथील कार्यालयात हजर रहावे असे आदेशही देण्यात आले आहेत.

भगत यांच्या टीमने महीना भरात 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत यांनी एप्रिल 2019 मध्ये या भरारी पथकाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी महिना भराच्या आचारसंहिता कालावधीत 16 लाख 83 हजाराची दारू व 19 लाख 20 हजार रूपये किमतीची वाहने असा मिळून तब्बल 36 लाख 3 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.