
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मोदींची भाषणे तपासल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली. असे असले तरीही त्यांना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगाच्या सदस्यांमध्येच मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मोदींना 2-1 च्या बहुमताने क्लीन चिट देण्यात आली.
महाराष्ट्रात वर्ध्यातील भाषणात मोदी यांनी राहुल गांधी यांनी वायनाड हा अल्पसंख्याकांचा सुरक्षित मतदारसंघ निवडणूक लढवण्यासाठी निवडल्याची टीका केली होती. तर लातूरच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणात हिंदुस्थानने अण्वस्त्रs दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत असे म्हटले होते. बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्दय़ावरून मतदारांना मत देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. याबाबत काँग्रेसने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, त्यांचे दोन सहकारी अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीपैकी एकाने मोदींना क्लीन चिट देण्याला असहमती दर्शवली होती.
मोदींना नांदेड, वाराणसीमधील वक्तव्यांप्रकरणी निवडणूक आयोगाची क्लीन चिट
नांदेड आणि वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूक प्रचार सभांमध्ये केलेल्या भाषणांप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे. मोदी यांना निवडणूक आयोगाकडून मिळालेली ही पाचवी क्लीन चिट आहे. नांदेड आणि वाराणसीमधील भाषणांतील वक्तव्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग झालेला नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
जेथे अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे, असा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडला आहे. वायनाड हा मतदारसंघ शोधण्यासाठी काँग्रेसने दुर्बिण वापरली असेही मोदी हे सभेत म्हणाले होते. तसेच पुलवामामध्ये त्यांनी आपले 40 जवान शहीद केले. आता आम्ही 42 दहशतवादी मारले. ही आमची कामाची पद्धत आहे, असे वक्तव्य मोदी यांनी नांदेडच्या प्रचारसभेत केले होते. या वक्तव्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.



























































