>> अस्मिता प्रदीप येंडे
‘नानाचा युरोप दौरा’ हा बारा कथांचा संग्रह म्हणजे मानवी मनाचे विश्लेषण, नात्या-नात्यांमधील गुंतागुंत दर्शवणारा आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा काहीना काही शिकवण आपल्याला देऊन जाते. प्रत्येक कथेची सुरुवात ही पात्रांच्या संभाषणातून होते. मग मध्ये मध्ये तृतीय पुरुषी निवेदक कथानक पुढे नेतो. या कथासंग्रहातील प्रत्येक पात्रे उत्तमरीत्या लेखकाने रंगविली आहेत. कथेचा वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ असा घटनाक्रम आहे. कथा पात्रांच्या संवादातून जास्त उलगडत जाते. वाचकांची उत्सुकता वाढवणे हा या कथासंग्रहाचा विशेष म्हणायला हवा. कारण एकदा का कथा वाचायला सुरुवात केली की, अनेक घटना-प्रसंग, पात्रे, रहस्य उलगडत जातात. कथेत पुढे काय घडेल याची उत्सुकता, कुतूहल निर्माण होते. पण कथेचा जो शेवट आहे त्यामुळे कथेला एक वेगळेच परिमाण प्राप्त होते. ही जादू आहे लेखक जगन्नाथ वर्तक यांच्या उत्तम लेखनशैलीची. लिखाणाद्वारे कुतूहल निर्माण करण्याची ही जादू वाचकांना भुरळ पाडते.
प्रत्येकाचं काहीना काही स्वप्न असतं. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब… आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. ‘नानाचा युरोप दौरा’ ही कथासंग्रहातील पहिलीच कथा. या कथेत एका कार्यालयात काम करणाऱया शिपायाची म्हणजेच नानाचे परदेशवारीला जाण्यासाठी चाललेले कष्ट, ध्यास यांचा प्रवास रेखांकित केलेला आहे. बेताची परिस्थिती असूनही नाना युरोपला जाण्याचे स्वप्न पाहतो आणि मग पैशांची व्यवस्था, पासपोर्टसाठी फोटो काढणे, पासपोर्ट, विसा या सगळय़ांसाठी त्याची आणि त्याच्या पत्नीची धावपळ सुरू होते. युरोपला जाण्यासाठी विमानतळावर पोहचतात आणि पोहचल्यावर कळते की नाना-नानी ‘पासपोर्ट’ची पिशवी घरीच विसरून आले. ध्येय पूर्ण करण्याचा नानाचा हा प्रवास या कथेतून मांडला आहे.
‘गोपाळय़ा’ ही दोन जिवलग मित्रांची कथा. काळाप्रमाणे सगळे बदलत जाते, तसेच या दोन मित्रांच्या आयुष्यातही बदल होतात. पण त्यांची मैत्री ही तशीच राहते. या निःस्वार्थी मैत्रीची कथा लेखकाने सांगितली आहे. ‘विनाशाच्या गर्तेत’ ही कथा ज्ञानबा आणि त्याची बहीण बंटीची आहे. आई-वडील गेल्यानंतर ज्ञानबाने बंटीचा सांभाळ केला, पण हळूहळू बंटी ज्या विनाशाकडे झुकत जाते त्यामुळे तिचे आयुष्यही उद्ध्वस्त होते आणि अखेर ती जगाचा निरोप घेते. समाजात वेगवेगळय़ा वृत्तीची माणसे असतात. आपलं भलं कशात आहे हे आपणच योग्य वेळी ओळखले तर विनाशापासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो, ही शिकवण या कथेतून मिळते.
‘परतफेड’ ही कथा सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोन भावंडांची आहे. एक महालात लहानाचा मोठा होतो तर दुसरा झोपडीत… सूर्यकांतला नेहमीच वापरलेल्या वस्तू दिल्या जायच्या. कधीच नवी कोरी वस्तू त्याला मिळाली नाही, पण मोठेपणी चंद्रकांतच्या लग्नात सूर्यकांत हा या गोष्टीची अशी काही परतफेड करतो की, कथा वाचताना अनपेक्षित धक्का बसतो.
माणसा-माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. संवेदनशीलता कमी होत चालली आहे. ‘निर्णय’ या कथेतील नायक चिंतामणी. त्याचे वडील निधन पावतात. तसे लगेच त्याची बहीण वाटणी मागायला येते. आई गेल्यानंतरही ती घराचा हिस्सा मागते. प्रसंग काय आणि माणूस वागतो काय… माणसापेक्षा, नात्यांपेक्षा पैसा मोठा झालाय हे सत्य आहे. चिंतामण-प्रमिला यांना लग्नानंतर मूलबाळ नसल्यामुळे ते अनाथाश्रमातून एक मूल दत्तक घेतात. त्याला वाढवतात, डॉक्टर बनवतात आणि एक दिवस तो मुलगा आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात आणतो तेव्हा त्या मुलाला सत्य कळते की, त्याला अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं आणि तोच मुलगा आज आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला आलाय. काय वाटले असेल त्या दोघांना! कथा वाचताना मन सुन्न होऊन जातं, पण सत्य कटू असतं, हे अगदी खरंय.
बालमजुरी या विषयावर भाष्य करणारी कथा म्हणजे ‘छबीचा विठू’ छबी आणि विठू यांच्या निर्मळ मैत्रीची ही गोष्ट आहे. या कथेतून सामाजिक विषमतेचे दर्शन घडते, गरिबीमुळे मुलांना मजुरी करून पैसे कमावण्यास भाग पाडले जाते, यात काम देणाऱया शेठचा दोष काय? असा प्रश्न कथेचा नायक विठू उपस्थित करतो.
‘टीप अर्थात बक्षीस’ या कथेतील वडिलांना त्यांचा मुलगा टीप देतो. काय वाटले असेल त्या वडिलांना? ज्याला आपण लहानाचे मोठे केले, सुशिक्षित केले, त्याच मुलाकडून वडिलांना टीप दिली जाते. आई-वडिलांच्या मनाची वेदना मांडणारी ही कथा आहे.
‘मिरज- मुंबई-मिरज’, ‘हॅलो डॉक्टर’, ‘तीर्थरूप आईस’, ‘लखपती’, ‘धबधबा’ या कथांमधूनही लेखकाने वास्तवतेचे रूप दर्शविले आहे. आपण कितीही कल्पकतेमध्ये रमलो तरीही वास्तव हेच सत्य आहे.
‘नानाचा युरोप दौरा’ हा कथासंग्रह सामाजिक स्तरातील वेगवेगळय़ा घटनांचा, मानवी वृत्तीचा, सत्य परिस्थितीचा परिचय वाचकांना करून देतो. या कथासंग्रहाला रेखा नार्वेकर (विश्वस्त, को.म.सा.प.) यांनी विवेचनात्मक प्रस्तावना लिहिली आहे. मुखपृष्ठ उमेश कवळे यांनी रेखाटले आहे. मलपृष्ठासाठी ‘शारदा प्रकाशनचे’ प्रकाशक प्रा. संतोष राणे यांनी मार्मिक पाठराखण लिहिली आहे.
नानाचा युरोप दौरा (कथासंग्रह)
लेखक – जगन्नाथ वर्तक
प्रकाशक – शारदा प्रकाशन, ठाणे
मूल्य – 220





























































