
सामना ऑनलाईन । प्रतापगड
काँग्रेसला मला संपवायचे आहे. त्यासाठी ते माझ्या विरोधात खोटा प्रचार तर करतातच त्याचबरोबर कारस्थानही रचत आहेत. पण माझी 50 वर्षांची तपस्या इतक्या सहजासहजी संपवणे शक्य होणार नाही. न थांबता, न थकता मी देशासाठी झटलो आहे. त्यामुळे मी स्वत:ही पडणार नाही आणि पक्षालाही पडू देणार नाही, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश येथील प्रतापगड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस तसेच सपा-बसपावर जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेते काही दिवसांपूर्वी मोदी लाटेला घाबरत होते. आता तेच म्हणतात, मोदींच्या मेहनतीवर आणि देशप्रेमावर डाग लागत नाही तोपर्यंत भाजपचा पराभव करता येणार नाही. परंतु काँग्रेसने हे लक्षात ठेवावे की, या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही. या निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवणारच, असे मोदी म्हणाले.
केंद्रात महाभेसळ असलेल्यांचे सरकार आल्यास भ्रष्टाचार, अस्थिरता, जातीयवाद, वंशवाद आणि कुशासन हे पाच प्रमुख धोके देशाला आहेत. महाभेसळ असलेल्यांचा पंजा देशासाठी धोकादायक असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सक्षम देशासाठी मजबूत सरकारची निवड करा, असे आवाहन यावेळी केले. प्रतापगडमधून 2014 मध्ये अपना दलचे कुंवर हरिवंश सिंह निवडून आले होते. यावेळी मात्र भाजपने हा मतदारसंघ अपना दलला न देता स्वतःकडे ठेवला आहे.
मायावती यांना सपा आणि काँग्रेस गंडवतेय
सपा आणि काँग्रेसने केलेल्या फोल दाव्यांची हवा निघून गेली आहे. महाआघाडीमागील सत्य आता समोर येत आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने बसपाचा आणि मायावतींचा वापर करून घेतला. मायावतींना पंतप्रधानपदाची स्वप्ने दाखवत त्यांना गंडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मायवतींच्याही आता हे लक्षात आले असून आपण एकटे पडल्याची जाणीव त्यांना झाली असल्यामुळे त्या आता काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसत असल्याचे मोदी म्हणाले.


























































