नगरमध्ये युतीचा ‘सुजय’, राष्ट्रवादीचा उमेदवार पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe-patil

सामना प्रतिनिधी । नगर

महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेली जागा म्हणजे नगर मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. अकराव्या फेरीअखेर सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यापेक्षा 1 लाख 24 हजार 302 मतांनी आघाडीवर होते.

राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवरून मागे हटण्यास तयार नव्हती. त्यामुळे काँग्रेस नेते, विधासभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये भूकंप झाला होता. दोन्ही बाजूने प्रचंड सभा घेण्यात आल्या होत्या. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. युतीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्याला मोठे यश मिळताना पाहायला मिळत आहे.

नगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिलीप गांधी यांनी विजय मिळवला होता. त्यांना 6,05,185 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव राजळे 3,96,063 मतं मिळाली होती.

2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपच्या दिलीप गांधी यांनी विजय मिळवला होता. दिलीप गांधी यांना 3,12,047 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले शिवाजीराव कर्डीले यांना 2,65,316 मतं मिळाली होती.

वाचा LIVE अपडेट:

https://www.saamana.com/loksabha-2019-election-results-live/