मनमाडकरही घेणार ‘लोकल’चा आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vasai-memu

सामना प्रतिनिधी। मुंबई

नुकत्याच झालेल्या निरीक्षणानुसार नाशिकची ही मेमू आता भुसावळपर्यंत धावणार आहे. त्यामुळे मनमाड-भुसावळकरही आता या मेमू लोकलचा आनंद लुटणार आहेत. सध्या मुंबई ते भुसावळ व भुसावळ ते मुंबई, भुसावळ ते देवळाली, मनमाड ते इगतपुरी व इगतपुरी ते मनमाड अशा पाच पॅसेंजर धावत आहेत. या गाडय़ांच्या जागेवर मेमू गाडय़ा धावणार आहेत.

मागील आठवडय़ात भुसावळ विभातील सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांना मेमूच्या बाबतीत बारकाईने प्रशिक्षण देण्यात आले आहे. भुसावळ विभागातील तांत्रिक विभागाचे डेपो, मनमाड, भुसावळ, बडनेरा, अमरावती येथे असून त्यातील सुमारे 60 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सहाय्यक विभागीय तांत्रिक अभियंता ए. एम. राजपूत यांनी प्रशिक्षण दिल्याची माहिती दिली. मेमूही गाडीचे लांब पल्ल्याच्या दरम्यान मेनलाइनसाठी डिझाइन केलेले आहे. 200 ते 300 किलोमीटर अंतरासाठी सहज धावणारी असल्याने मेमू लोकलचा आनंद फक्त नाशिकपुरताच मर्यादित न राहता आता भुसावळपर्यंतच्या प्रवाशांना घेता येणार आहे.

मेमू प्रकारच्या लोकलसाठी फलाटाची उंची हा मोठा अडसर होता, परंतु मेमू प्रकारच्या लोकलला अडीच फूट खाली पायऱया असल्याने फलाटाची उंची कमी-जास्त असली तरी चालणार आहे. यामुळे रेल्वेचा खर्च आणि वेळ वाचून गाडी कधीही सुरू करता येणार आहे.

कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण देणार
येथील झोनल रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी 17 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या मार्गावर मेमू लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याप्रामाणे रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले. कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण देऊन येत्या काही दिवसांत मेमू लोकल धावणार हे निश्चित असल्याची प्रतिक्रिया नितीन पांडे यांनी व्यक्त केली.

या आहेत सुविधा

मेमू लोकल ट्रेनमुळे प्रवाशांना टी-18 ट्रेनसारखी सुविधा प्रति तासात 130 ते 180 किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. पश्चिम रेल्वेवर मेमू प्रकारची लोकल दिवा-वसई-विरार मार्गावर सुरू आहे.

आरामदायी गाडीत एकूण 2618 प्रवासी प्रवास करू शकतात. मेमू ट्रेनमध्ये रिजेनरेटिव ब्रेकिंग सिस्टम लावल्याने 35 टक्के ऊर्जेची बचत होणार आहे. प्रत्येक कोचमध्ये दोन टॉयलेटची सुविधा असणार आहे.

ड्रायव्हरच्या केबिनपासून तातडीचा संवाद साधण्याची सुविधा असणार आहे. ट्रेनमध्ये टी-18 रेल्वेच्या धर्तीवर लोकलमध्ये व ड्रायव्हर कॅबच्या बाहेर सीसीटीव्ही असणार आहे. जीपीएसवर आधारित प्रत्येक स्टेशनवर अनाऊन्सेंट सिस्टम लावली आहे.