
सामना प्रतिनिधी। मुंबई
पत्रकार आणि पोलीस असल्याचे सांगून अत्तर विकणाऱया व्यावसायिकाला दम देत पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांचे अन्य साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
वडाळय़ात राहणारे शंकर पांडे (56) यांचा मस्जिद बंदर येथील सॅम्युअल स्ट्रीट येथे अत्तर बनविण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाच जण त्यांच्या कार्यालयात आले आणि तुम्ही बनावट अत्तर बनवता, अत्तरांचा फोटो काढा असे बोलू लागले. तेव्हा तुम्ही कोण, असे पांडे यांनी विचारले असता त्यातील एकाने पत्रकार असल्याचे सांगत एका साप्ताहिकाचे ओळखपत्र दाखविले. हे सुरू असताना त्याच्यासोबत आलेल्या तिघांनी तेथून काढता पाय घेतला. ते तिघे सटकल्यामुळे पांडे यांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी कंट्रोल रूमला फोन करून पोलीस मदत मागितली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पांडे यांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी पोलिसांनी दोघांकडे विचारपूस केल्यावर पत्रकार तरुणाने त्याचे नाव फ्रान्सिस ऑगस्टीन डिसुजा (26) तर पोलीस असल्याची बतावणी करणाऱया तरुणाने त्याचे नाव गौरव मोरे सांगितले. मात्र चौकशीवेळी मी पोलीस नसल्याचे मोरे याने स्पष्ट केले. दरम्यान, या दोघांनी पांडे यांना बनावट अत्तर बनवत असल्याचा दम देत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फ्रान्सिस आणि गौरवला अटक केली आहे.


























































