देवरुखमधील युयुत्सू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जे. डी. पराडकर

महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणारा अज्ञात कौरव म्हणून युयुत्सूचे नाव पुढे आले. तसेच आज समाजातील अडचणीत असलेल्याला आणि पीडिताला न्याय देणारे नाव म्हणून युयुत्सू आर्ते परिचित आहेत. पुराणातील युयुत्सू काल्पनिक असेलही, पण देवरूखमधील एक युयुत्सू आर्ते सामाजिक काम त्याच पद्धतीने करीत आहे.

रत्नागिरी जिह्यातील दापोलीच्या हर्णेचे मूळ ग्रामस्थ असलेल्या दलितमित्र रमाकांत आर्ते यांच्या कुटुंबात नगरमध्ये आजोळी युयुत्सु यांचा जन्म झाला. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेनुसार रमाकांत ऊर्फ अप्पा यांनी मृत जनावरांची कातडी सोलून त्याचे बहुपयोग होऊ शकतात हे सिद्ध केले. याच कामासाठी अप्पा नोकरी सोडून थेट देवरूखात दाखल झाले. वडिलांसोबत युयुत्सु यांनाही देवरूखात यावे लागले. बालवाडी ते माध्यमिक शिक्षण देवरूखात घेतल्यावर राष्ट्र सेवा दलाच्या नियमित शाखेवर ते जाऊ लागले. कॉलेजमध्ये त्यांनी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे काम केले.
पुढे युयुत्सुना एअर इंडियात नोकरी मिळाली. मात्र तेथील दोन वर्षांच्या कामानंतर गावात जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हक्काचा व्यवसाय करायचा, महिन्यातले 15 दिवस काम करून नोकरीएवढे पैसे कमवायचे व पुढचे 15 दिवस हे इतर सर्व क्षेत्रांमध्ये झोकून द्यायचे असा निर्णय घेतला. 15 वर्षांपूर्वी देवरूखात आल्यावर वडिलांचे चर्मालयाचे काम सांभाळत त्यांच्या बरोबरीनेच त्यांनी श्रमभारती मोटर्सची मुहूर्तमेढ रोवली. व्यवसायात चांगला जम बसवला. मात्र आधीच ठरवल्याप्रमाणे 15 दिवस व्यवसाय आणि 15 दिवस इतर क्षेत्रात काम याप्रमाणे त्यांनी कार्य सुरू केले.
एस.टी. प्रवासी संघटना स्थापन करण्यापासून ग्रामशिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती आदी संघटनांमध्येही सक्रिय सहभाग त्यांनी दिला. राज्य शासनाच्या तंटामुक्ती समितीचे सदस्य, चिपळूणच्या संवाद स्वयंसेवी संस्थेचे उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा खादीसंघ कणकवलीचे निमंत्रित व्यवस्थापन मंडळ सदस्य, अप्पासाहेब पटवर्धन ट्रस्ट, समाजवादी अध्यापक सभेचे सचिव, ट्रेनिंग सेंटर असोसिएशन महाराष्ट्रचे सदस्य, भ्रष्टाचारविरोधी ग्रामविकास आघाडीचे प्रवक्ते, संघर्ष सोळजाई मंडळाचे सल्लागार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य अशा अनेक जबाबदाऱया ते सांभाळत आहेत. एवढेच नव्हे तर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी काही तरी करावे यासाठी त्यांनी संगमेश्वर तालुका रस्सीखेच ऍकॅडमीची स्थापना केली. देवरूख स्पोर्टस् ऍकॅडमीतून तालुक्यातील महिलांचा कबड्डीचा संघ, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी संगमेश्वर प्रतिष्ठानची स्थापना ही कामे त्यांच्या नावावर आहेत. दुसरीकडे ‘हाक मारा आम्ही सज्ज आहोत’ या अभियानांतर्गत आर्ते आणि त्यांचे सहकारी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडणाऱया अपघातांमध्ये जखमी होणाऱया प्रवाशांना मदत करण्यासाठी स्वखर्चाने महामार्गावर कोणत्याही ठिकाणी दाखल होतात.

जखमींना आवश्यक ती मदत करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याकरिता त्यांचा नेहमीच मदतीचा हात असतो. संगमेश्वर तालुक्यात दरवर्षी अनेक भागात पुराचा फटका बसतो. नैसर्गिक आपत्तीत अडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी आर्ते आणि सहकारी नेहमीच पुढे असतात. विहिरीत पडणारी मुकी जनावरे असोत वा बिबटे किंवा अन्य रानटी प्राणी या सर्वांचे प्राण वाचविण्यासाठी आर्तेंच्या नेतृत्वाखाली देवरूखात तरूणांची एक फळी कायम कार्यरत असते. देवरूख शहरातील छोटे व्यापारी यांना एकत्रित करून त्यांनी देवरूखात झेरॉक्स, फोटोग्राफर, चायनीज विक्रेते, छोटे हॉटेल व चहा टपरीवाले, अल्पबचत एजंट आदींच्या संघटना उभ्या केल्या. पदं खूप असली म्हणजे मोठेपणा झाला असे नव्हे तर त्या प्रत्येक पदाच्या जबाबदारीला तेवढाच न्याय देणे हे एक आव्हान असते. ते पेलताना युयुत्सु यांना कोणताच त्रास होत नाही. उलट अधिकाधिक जबाबदारी पेलायला त्यांना आवडते. युयुत्सु या नावाचा अर्थ सतत संघर्षाला तयार असा असल्याने नावाप्रमाणेच त्यांचा सामाजिक कार्याचा संघर्ष कायम सुरू आहे.

[email protected]