दखल- ऋणानुबंधांच्या गाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नमिता दामले

मुखवटय़ामागील चेहरा’ या प्रस्तुत कादंबरीच्या लेखिका सोनाली दिघे यांच्या लेखनाला पुरस्कार मिळाले आहेत. कादंबरी लेखन हा तसा अवघड विषय लेखिकेने आत्मविश्वासाने हाताळला आहे.

श्वेता या लंडनस्थित नायिकेच्या जीवनातील सात वर्षांच्या कालखंडातील घडामोडी आणि बदलत्या परिस्थितीमुळे तिच्या मनोवस्थेमध्ये येत गेलेली स्थित्यंतरे याभोवती कथानक घट्ट विणलेले आहे. श्वेताच्या आयुष्यात येणारी निरंजन व डॉक्टर ही पात्रेही तितकीच महत्त्वाची आहेत आणि या व्यक्तिरेखांचा विकासही उत्तम घडला आहे. ऍलन हा खलनायक असून विकृत प्रवृत्तीचा असल्यामुळे कादंबरीच्या पटावरील मोहरे हे काळे आणि पांढरे रंग घेऊन वावरतात. ऍलिस म्हणजेच सखी हा नीरंजन आणि श्वेता यांना एकत्र आणणारा महत्त्वाचा दुवा असून ज्योती, नीरंजनचे आई-बाबा, स्टेला ही सारी सहाय्यक पात्रे कथानकाचा तोल साधतात.

कथनशैली अत्यंत प्रवाही व सहज आहे. भाषाशैली स्थलकालानुरूप असल्यामुळे मनाला भावते. कादंबरीची पाने पटापट उलगडत जातात व सहजच एका वाचनात पुस्तक हातावेगळे होते आणि तरीही ते मनात घर करते आणि इथेच लेखिका यशस्वी होते.

आपल्या अवती-भवती घडणाऱया घटना, त्याचा आपल्या जीवनावर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम आणि यातून ताऊन-सुलाखून बाहेर पडणारा प्रत्येक माणूस हा अत्यंत गंभीर विषय आहे. आयुष्यातून काय घ्यायचे, काय सोडायचे आणि काय द्यायचे याची समजूत देणारी ही गोष्ट आहे. यशूनी श्वेताच्या आयुष्याला दिलेली कलाटणी ही नीरंजन श्वेताच्या एकत्र येण्याला अर्थ आणि परिपूर्ती देते. ‘मुखवठय़ामागील चेहरा’ कादंबरीचे
वाचन करून शोधायला नक्कीच आपल्याला आवडेल.

मुखवटय़ामागील चेहरा
लेखिका-सोनाली दिघे
प्रकाशक-परिस पब्लिकेशन, पुणे-30
पृष्ठ-108, मूल्य-150