
सामना प्रतिनिधी। मुंबई
22 वर्षीय नृत्यशिक्षिकेला एकतर्फी प्रेमातून छळणाऱया मजनूच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फोन, मेसेज करून त्याने तरुणीचा छळ मांडला होता.
पदवीधर असलेली करिश्मा (नाव बदललेले) ही घाटकोपरमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. ती घरातच नृत्य शिकविण्याचे काम करते. गेल्या वर्षभरापासून एक तरुण तिला नाहक त्रास देत होता. तो तरुण करिश्माच्या ओळखीतलाच आहे. 2015-16 साली करिश्मा कॉलेजमध्ये असताना आकाश मजकुरे (22) हादेखील तिच्या वर्गात होता. त्यावेळी आकाशने तिला प्रपोजदेखील केले होते, मात्र तिने त्याला नकार दिला होता. दरम्यान, ऑगस्ट 2018 पासून आकाश करिश्माच्या घराबाहेर उभा राहू लागला. तो करिश्माचा पाठलागदेखील करायचा पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. मार्च 2019 मध्ये करिश्माला अज्ञात नंबरवरून फोन आला आणि आम्हाला नृत्यांगना पाहिजे असल्याचे बोलू लागला. हा फोन आकाशने केला असल्याचे समजताच करिश्माने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आकाशचा त्रास वाढू लागल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला बेडय़ा ठोकल्या.





























































