अमेठीतील राजकीय हत्येने खळबळ, स्मृती इराणींनी दिला पार्थिवाला खांदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमेठी

लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठीतून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अमेठी आणि बरौलिया गावचे माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली. जवळच्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर भाजप नेत्या आणि खासदार स्मृती इराणी तडक अमेठीला पोहोचल्या. येथे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी स्मृती इराणी भावूक झाल्या आणि त्यांनी अंत्ययात्रेमध्ये सहभागी होत पार्थिवाला खांदाही दिला.

हत्येची माहिती मिळताच स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये धाव घेतली. या ठिकाणी त्यांनी मयत सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्मृती इराणी भावून झाल्या आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. यानंतर त्यांनी अंत्ययात्रेमध्ये सहभागी होत सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

irani-s

स्मृती इराणी यांचे जवळचे सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री मोटारबाईकवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, सिंह यांच्या हत्येमागे काँग्रेस असल्याचा दावा सिंह यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.