कचरा डेपो आगप्रकरण, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख पैठणकर यांचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. मंगळवारी रात्री उशिरा आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कारवाईचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

शहरातील घनकचरा संकलन, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निविदा प्रक्रिया, राष्ट्रीय हरित लवादाकडे सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहणे, स्वच्छ भारत अभियानात शहराचे घसरलेले रॅकिंग, शौचालयांची प्रलंबित कामे, प्लॅस्टिक वापरावर न होणारी कारवाई, प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसाठी अपेक्षित आराखडा सादर न केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयुक्तांना बजावण्यात आलेली कारवाईची नोटीस, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार आणि दोन दिवसांपूर्वी कचरा डेपोला लागलेली आग अशा विविध मुद्द्यांच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.