पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूलच्या कार्यकर्त्यात हिंसाचार, पाच जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते शनिवारी संध्याकाळी भिडले. यावेळी झालेल्या हाणामारीत चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूलच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. आणखी काही कार्यकर्ते बेपत्ता असल्याचे देखील समजते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान तसेच निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाले. निवडणूकीचा निकाल लागून तब्बल 16 दिवस लोटले असतानाही हा हिंसाचार झाला. कोलकातापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या नयजात येथे भाजपने विजयी रॅली काढली होती. या रॅलीच्या वेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारानंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चार भाजप कार्यकर्ते व एका तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. सुकंता मोंडल, प्रदीप मोंडल, तपन मोंडल, देबदास मोंडल अशी मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. तर कुय्यम मोल्लाह असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.