
सामना प्रतिनिधी । रेणापूर
रेणापूर तालुक्यात सोमवारी दुपारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, सोमवारी दुपारी रेणापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पहिल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आता पेरणीच्या कामांना गती येणार आहे.
या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साठून केलेली बांधबंदिस्ती फुटून गेली आहे. रेणापूर तालुक्यातील ईटी,पळशी, खानापूर, भोकरंबा, डिघोळ, बिटरगाव, कुंभारी या गावात भरपूर पाऊस झाला. इटी गावात अनिल कुलकर्णी यांच्या शेतात नालासरळी अंतर्गत बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. पण या पावसात तो बंधारा फुटून गेला आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले आहे. हा पाऊस पेरणीसाठी उपयोगी आहे. या पावसामुळे गावातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल. पावसाचे आगमन झाल्याने गावकरी व शेतकरी सुखावले आहेत.




























































