
सामना प्रतिनिधी । मालवण
कालावल खाडीपात्रातील मसुरे कावावाडी येथील मसुरकर जुवा बेटावरील जमीनीची मोठ्या प्रमाणात धुप होत आहे. त्यामुळे माडाची झाडे कोसळत असून माड बागायती धोक्यात आली आहे. धोकादायक स्थितीतील अनेक झाडे खाडीपात्रात उन्मळून पडण्याची भीती आहे. बेटासाठी धूपप्रतीबंधक बंधारा मंजूर झाला असून निविदा प्रक्रियाही झाली आहे. मात्र, पर्यावरण, सिआरझेड विभागांच्या परवानग्या लालफितीत अडकल्या आहेत. शासनाने तातडीने कार्यवाही करुन बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कालावल खाडीपात्रात मसुरेनजीक मसुरकर जुवा हे निसर्गरम्य बेट असून या बेटावर मसुरकर कुटुंबीयांची घरे तसेच मोठ्या प्रमाणात माडबागायती आहे. नारळ तसेच माडाच्या झाडावर येथील ग्रामस्थ उपजिविका करतात. बेटाचा भूभाग खचत असल्याने ग्रामस्थांचे उत्पन्नाचे साधन असणारी माडाची झाडे उन्मळून कोसळत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोसळलेल्या झाडांचे महसूल प्रशासन पंचनामा करत आहे. मात्र, बंधारा कधी होणार असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. खाडीपात्रात वाळू टेंडरद्वारे लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळत आहे. त्यामुळे बंधारा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. या बेटावरील सर्व माड बागायती खाडीपात्रात कोसळल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे काय? असा सवालही विचारण्यात येत आहे. शासनाने आतातरी या बेटाच्या धूपप्रतीबंधक बंधाऱ्याबाबतच्या परवानग्या तातडीने देऊन काम सुरू करावे अशी मागणी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल मसुरकर यानी केली आहे.




























































