शाळांना आठवडय़ातून एक तास विनामूल्य मैदान देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबई शहर किंवा उपनगरातील ज्या शाळांना स्वतःची मैदाने नाहीत अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुंबई महानगरपालिकातर्फे आठवडय़ातून एक तास विनामूल्य मैदान उपलब्ध करून दिले जाईल. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

कुलाबा येथील सविता चंद्रशेखर या खेळाच्या मैदानात शाळकरी मुले मोठय़ा प्रमाणात खेळण्यासाठी येतात. मात्र मुलांना तिथे पिण्याचे पाणी किंवा शौचालयांची व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलांची गैरसोय होत असल्याची लक्षवेधी कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी उपस्थित केली. त्यामध्ये उपप्रश्न विचारताना सदस्य हेमंत टकले यांनी अनेक अनुदानित वा नोंदणीकृत शाळांना स्वतःची मैदाने नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना योगेश सागर म्हणाले, शहरातील कोणतेही मैदान हडपण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. देखरेखीसाठी दिलेली मैदाने परत घेण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे सांगितले. कुलाबा येथील सविता चंद्रशेखर हे 12 हजार 800 चौरस मीटरचे मैदान मे. गार्डन स्पोर्टस् ऍण्ड रिक्रीएशन सोसायटी संस्थेला 1985 पासून देखरेखीसाठी देण्यात आले आहे. या मैदानावर ऑस्कर फाऊंडेशनला 20 मीटर बाय 40 मीटर आकाराचे फुटबॉल टर्फ उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित मैदान फुटबॉल वगळता अन्य खेळांसाठी उपलब्ध आहे.

ऑस्कर फाऊंडेशनने तिथे तात्पुरत्या स्वरूपात चेंजिंग रूम तसेच टॉयलेट उभारावे अशी अट घालण्यात आली आहे. मात्र या मैदानात महानगरपालिकेतर्फे कायमस्वरूपी पिण्याचे पाणी आणि टॉयलेटची सुविधा महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी टॉयलेट उभारण्यास उशीर होत असेल तर ई-टॉयलेट उभारले जाईल, अशी ग्वाही योगेश सागर यांनी दिली.