
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महसूल वाढल्यास विविध उत्पादनावरील 12 आणि 18 टक्के जीएसटीचे विलीनीकरण होऊ शकते, अशी शक्यता माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तविली आहे. आलिशान आणि घातक वस्तू वगळता 28 टक्के जीएसटीचा दर संपुष्टात आल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले.
जीएसटीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जेटली यांनी सोमवारी फेसबुक पोस्ट केली. यात त्यांनी म्हटले आहे की,‘20 राज्यांच्या महसुलात 14 टक्के नफा झाला आहे. त्यामुळे जीएसटीमुळे सुरुवातीला झालेल्या नुकसानाची राज्याला केंद्राकडून आता भरपाई देण्याची गरज नाही.’ 1 जुलै 2017 मध्ये 17 स्थानिक कर रद्द करून जीएसटी लागू करण्यात आला. मोदी सरकारचे पहिले अर्थमंत्री अरूण जेटली हे जीएसटी कौन्सिलचे अध्यक्ष होते.
ग्राहकांशी संबंधित जास्तीत जास्त वस्तू या 18, 12 आणि 5 टक्के स्लॅबमध्ये आहेत. मागील दोन वर्षात जीएसटी कौन्सिलने अनेकदा करदरात कपात केली. ज्यामुळे केंद्राला 90 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. 2018-19 या गेल्या आर्थिक वर्षातील जून महिन्यापेक्षा 2019-20 या आर्थिक वर्षातील जून महिन्याचा जीएसटी महसूल 1.86 टक्क्यांनी जास्त असल्याचेही केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जीएसटीमधून जूनमध्ये 99 हजार कोटी जमा
जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत जूनमध्ये 99 हजार 939 कोटींचा निधी जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात 95 हजार 610 कोटींचा महसूल जमा झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. जूनच्या जीएसटीमध्ये केंद्राचा जीएसटी 18 हजार 366 कोटी रूपये आहे. तर राज्याचा जीएसटी 25 हजार 343 कोटी रूपये इतका आहे.

























































