
सामना प्रतिनिधी, राहुरी
राहुरीच्या मुळा धरणावर नव्याने सुरू झालेल्या महामंडळाच्या मस्यपालन केंद्राजवळील पाण्यात 42 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे.आत्महत्येच्या या घटनेने मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी दुपारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास मुळा धरणावरील नगर एम.आय.डी.सी.वॉटरस्पलाय जवळ असलेल्या मस्यपालन केंद्राजवळ ही घटना घडली. एम.एच.15 एफ.जी.1679 या अॅक्टीवा मोपेडवर सदर महिला मुळा धरणावर आली होती. धरणावर नव्याने सुरू झालेल्या महामंडळाच्या मस्यपालन केंद्राजवळील पाण्याच्या दिशेला या महिलेने पळत जाऊन आपल्या हातातील एक मोबाईल पाण्यात फेकून धरणाच्या पाण्यात उडी मारली. हा प्रकार परिसरातील मच्छिमारांनी पाहिल्याने मारूती गायकवाड, सुनिल माळी, साहेबराव जाधव, करण परदेशी, दत्ताञय वायसे, नाना पवार, राजू सोनवणे, गणेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या महिलेचा शोध घेतला. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृतदेह हाती लागला. या महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली. आत्महत्या केलेल्या महिलेच्या पर्समध्ये आणखी दोन मोबाईल आढळून आले. ही महिला राहुरी परिसरातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नाही. क्षेत्रात प्रवेश करण्यावर कागदोपत्री निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांची संख्या उदंड झाली आहे. यापूर्वी देखील पाण्यात आत्महत्या तसेच बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना मुळा धरणावर घडल्या असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.



























































