पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कसारा

हिंदुस्थानच्या इतिहासाची जपणूक करण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची करणारे ‘पद्मश्री’ सदाशिव गोरक्षकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. वासिंदच्या भातसई येथील वैकुंठभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचा गाढा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.

सदाशिवराव गोरक्षकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शनिवारी सकाळी वासिंदजवळील भातसई निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सहाय्यक अभिरक्षक म्हणून 1964 मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरुख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.

‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘ऑनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या शीर्षकातून त्यांच्या लेखनाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली अजून एक लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱया शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्तकालीन शिल्पकलेवरही लेखन केले. त्यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाची दखल सरकार दरबारी घेतली गेली आणि त्यांना 2003 मध्ये ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले होते. 2016 मध्ये त्यांना ‘चतुरंग’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. गोरक्षकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर व वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वळवी, चित्रलेखा तळेकर, विठ्ठल भेरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.