सहलीवरून परतणाऱ्या 9 विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; यवतजवळ अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । यवत/लोणी काळभोर

रायगडहून सहलीवरून परतणाऱ्या 9 विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार दुभाजकाला ओलांडून ट्रकला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. हा अपघात आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावानजीकच्या कदम वाकवस्ती येथे घडला. ही बातमी समजताच यवत गावावर शोककळा पसरली. यवत ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवली.

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूरमहंमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजिज मुलाणी अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण दौंड तालुक्यातील यवत गावचे रहिवासी होते.

यवत येथून हे सर्व मित्र  रायगड येथे फिरण्यासाठी गेले. दिवसभर रायगड परिसरात वर्षा विहारासह भटकंती केल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास सर्वजण पुन्हा यवतकडे निघाले. मध्यरात्री दीडच्या सुमाराला पुणे-सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर चालक निखिल वाबळेचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरात धडकली. त्यात सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

दत्ता यादव हा उंड्री भागातील जेएसपीएमएस महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, तर  निखिल वाबळे हा लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल यादव हा वाघोलीतील जेएसपीएमएस महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुभम भिसे हा उरळी कांचनजवळील कासुर्डीत महात्मा गांधी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. अक्षय दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. नूरमहंमद दारा हा कला शाखेत  दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज हा आझम कॅम्पसमधील पूना कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षयचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता, तर जुबेर मुलाणी नोकरी करत होता. हे नऊही तरुण एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते.

हॉटस्ऍप स्टेटसला ठेवलेले‘रेडी टू गो’ दुर्दैवाने खरे ठरले

परवेज आत्तार याने लोणी काळभोर ‘रेडी टू गो’ असे लिहीत सर्व मित्रांचा सेल्फी आपल्या हॉटस्ऍप स्टेटसला ठेवला होता. आपली फिरायला जाण्याची तयारी झाली आहे अशा भावनेने परवेजने हा मजकूर लिहिला होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या ठिकाणी या मित्रांनी हा फोटो काढून हॉटस्ऍप स्टेटसला ठेवला त्याच भागात म्हणजे लोणी काळभोर भागात हा दुर्दैवी अपघात झाल्याची लोकांमध्ये चर्चा होती.